मनोज जरांगे अपघातातून थोडक्यात बचावले; लिफ्ट जोरात तळमजल्यावर कोसळली
बीड: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील आज शिवाजीराव क्रिटिकल केअर हॉस्पिटल, बीड येथे एका गंभीर अपघातातून थोडक्यात बचावले. दुपारी सुमारे 1.30 वाजता, ते आपल्या 10-12 समर्थकांसह लिफ्टने हॉस्पिटलच्या वॉर्डकडे जात होते. यावेळी लिफ्ट अचानक पहिल्या मजल्यावरून थेट तळमजल्यावर कोसळली. ही थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, लिफ्टने पहिल्या मजल्यावर पोहोचताच ती जोरात खाली पडते. यानंतर लिफ्टमध्ये असलेल्या व्यक्तींमध्ये गोंधळ निर्माण होतो. यावेळी तळमजल्यावर असलेला एक कर्मचारी तत्काळ दरवाजा तोडून सर्वांना बाहेर काढतो.
मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया -
या संपूर्ण प्रकारानंतर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'मी एका रुग्णाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलो होतो. लिफ्टने वॉर्डकडे जात असताना ती अचानक जोरात खाली पडली. एक क्षणासाठी सगळ्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर जखमी झाले नाही.'
हेही वाचा - माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिलं स्पष्टीकरण
शिवाजी रुग्णालयाची लिफ्ट तळमजल्यावर कोसळली -
हा अपघात नेमका कशामुळे झाला? शिवाजी रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड होता का, की क्षमतेपेक्षा जास्त लोक लिफ्टमध्ये होते? याबाबत हॉस्पिटल प्रशासनाने संपूर्ण चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. बीड प्रशासनालाही याची माहिती देण्यात आली असून सुरक्षा तपासणी सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा - नितीन गडकरी यांचे निवासस्थान बॉम्ब उडवून देण्याची धमकी; काही तासांतच आरोपीला अटक
कोण आहेत मनोज जरांगे?
मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावचे रहिवासी आहेत. जरांगे हे मराठा आरक्षणासाठी झगडणारे अग्रगण्य कार्यकर्ते आहेत. 2011 पासून ते मराठा समाजासाठी ओबीसी कोट्यातील आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करत आहेत. त्यांनी 2023 पर्यंत 30 हून अधिक वेळा उपोषण केलं आहे.