बीडमध्ये लग्नाच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळ्या

बीड जिल्ह्यात लग्नाच्या नावाखाली लाखोंचा गंडा; आठवडाभरात दोन टोळ्या जेरबंद

बीड: बीड जिल्ह्यात लग्नाच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याचं समोर आलं आहे. विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबांना लक्ष्य करून, लग्नासाठी मोठ्या रकमा उकळून महिलांना पत्नी म्हणून दाखवून केवळ दोन दिवसांत पळून जाण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे पोलिसांची चिंता वाढली असून, नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक गावात घडलेल्या प्रकरणात, एका तरुणाचं लग्न जुळवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्यांनी जवळपास पावणे सहा लाख रुपये घेतले. मात्र पैसे घेतल्यानंतरही नववधू काही दिवसांनी पळून गेली. या प्रकारामुळे फसवणुकीची शक्यता व्यक्त करताच पीडित युवकाच्या वडिलांनी अंभोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत सात जणांच्या टोळीला अटक केली. हेही वाचा:स्थानिक निवडणुकांची तयारी सुरू; मुंबई महापालिकेसाठी ‘एक प्रभाग, एक नगरसेवक’

दुसरा प्रकार वडवणी पोलीस ठाणे हद्दीत समोर आला. येथे ऊसतोड कामगार असलेल्या एका तरुणाने लग्नासाठी तीन लाख रुपये मध्यस्थांकडे दिले होते. लग्न विधी पार पडल्यावर अवघ्या दोन दिवसांत वधू गायब झाली. ही घटना देखील अगदी पहिल्यासारखीच असल्याने पोलिसांनी संशय घेऊन चौकशीला सुरुवात केली आणि या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली.

या दोन्ही घटनांमध्ये एक साम्य आहे - लग्नासाठी पैसे घेऊन, बनावट लग्न लावून देणं आणि नंतर नववधूंना काही दिवसांत गायब करून पीडितांकडून मोठी रक्कम उकळणं. ही एक संगठित टोळी असून ती वेगवेगळ्या भागात फिरत आहे आणि गरीब, साध्या भोळ्या कुटुंबांना फसवत आहे. हेही वाचा: 'सत्तेत राहून लोकांची सेवा न करता लूटमारच केली'; राऊतांचा पवारांवर आरोप

बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी या प्रकरणावर लक्ष ठेवत कारवाईचे आदेश दिले असून, त्यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, कोणत्याही मध्यस्थी व्यक्तीच्या आमिषाला बळी पडू नये. लग्न ठरवताना संबंधित व्यक्तींची आणि कुटुंबाची योग्य पार्श्वभूमी तपासून खात्री करावी.

पोलिसांनी अशा टोळ्यांवर कठोर कारवाई सुरू केली असून, पुढील काही दिवसांत आणखी काही अटकेसाठी मोहिम राबवली जाणार आहे.या घटनांमुळे समाजात मोठी खळबळ उडाली आहे.