तब्बल 19 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि शिवसेना नेते

19 वर्षांची प्रतिक्षा संपली; मीनाताई ठाकरे नाट्यगृहाचे शिंदेंच्या हस्ते लोकार्पण

रत्नागिरी: तब्बल 19 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडले. सुमारे साडे अकरा कोटी रुपये खर्च करून आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे नाट्यगृह 19 वर्षांनंतर पुन्हा एकदा नाट्यप्रेमी आणि रसिक प्रेक्षकांच्या सेवेसाठी दाखल झाले आहे. या लोकार्पणामुळे खेडच्या सांस्कृतिक वाटचालीला नवे बळ मिळाले असून नाट्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार भरत गोगावले आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम देखील उपस्थित होते. 

हेही वाचा: 'संस्थेद्वारे होणाऱ्या गैरकारभाराची शासनाने चौकशी करावी' - माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील

उद्योगमंत्री उदय सामंत काय म्हणाले?

'या सांस्कृतिक केंद्राकडे 2009 पासून कोणीही लक्ष दिले नाही. मात्र, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी संवेदनशीलपणे आणि प्रामाणिकपणे काम करत हे केंद्र पुन्हा एकदा रसिक-प्रेक्षकांसाठी उभे केले', अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. काही नेत्यांनी योगेश कदम यांच्यावर केलेल्या आरोपांवर उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, 'ज्यांनी पालकमंत्री असताना एक रुपयाही दिला नाही, आज तेच आरोप करत आहेत. मात्र आम्ही सांस्कृतिकदृष्ट्या खऱ्या अर्थाने योगदान दिले आहे'. 

यावेळी, सांस्कृतिक केंद्रासाठी 80 लाखांची प्रशासकीय मंजुरी पुढील तासाभरात जिल्हा नियोजनातून दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. यासह, बसस्थानकासाठी दोन कोटींची मंजुरी दोन दिवसांत मिळेल आणि शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आवश्यक निधी देण्याचे आश्वासनही सामंत यांनी दिले. यावेळी, मंत्री उदय सामंत म्हणाले की, 'कोकणची गरज ओळखून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणची खरी सेवा केली आहे'.