राज ठाकरे हिंदूविरोधी असून त्यांच्या मनसे पक्षाची

संदीप देशपांडे यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा कॉल

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठी-अमराठी वाद पुन्हा उफाळून आला आहे. राज ठाकरे हिंदूविरोधी असून त्यांच्या मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी अशी याचिका उत्तर भारतीय विकास सेनेकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे. त्यानंतर मनसेचे संदीप देशपांडे यांनी या घटनेबद्दल आक्रमक प्रतिक्रिया देत म्हटले, 'जर हे भैय्या लोक आमच्या पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी करत असतील, तर आम्हाला देखील त्यांना इथे राहू द्यायचं किंवा नाही याचा विचार करावा लागेल'. मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केलेल्या या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले असून मंगळवारी रात्री त्यांना एका अज्ञात फोनवरून धमकी मिळाल्याची बातमी समोर आली आहे.

दादर पोलीस ठाण्यात येऊन नोंदवली तक्रार:

या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. संदीप देशपांडे यांना अज्ञात इसमाने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. देशपांडे यांनी तातडीने दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस तपास सुरु झाला आहे. देशपांडे यांनी सांगितले, 'रात्री 10.15 वाजता मला अज्ञात नंबरवरून फोन आला. संबंधित व्यक्तीने अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. मी कॉल रेकॉर्ड केला असून संबंधित ऑडिओ पोलिसांना दिला आहे. मनसे अशा धमक्यांना घाबरत नाही', असे मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटले.

मनसे कुणाला घाबरत नाही:

याबाबत संदीप देशपांडे यांनी माहिती दिली, 'असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना अजिबात घाबरत नाही. याबाबत मी पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली आहे. कर कुणी जाणूनबुजून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचं षडयंत्र करत असेल, तर त्याचा शोध वेळीच घेतला पाहिजे', अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली.

संदीप देशपांडे यांनी केला सवाल:

मनसेची मान्यता रद्द करावी यासाठी कोणता तरी भैय्या कोर्टाची पायरी चढला आहे. मराठी माणसाचा पक्ष कायमस्वरूपी बंद व्हावा म्हणून जर हे भैय्या लोक नियोजनबद्ध षड्यंत्र रचू लागले, तर या भैय्या लोकांना महाराष्ट्रात ठेवायचे किंवा नाही यावर आम्हाला विचार करावा लागेल. 'हे भैय्या लोक ठरवणार का की आमचा पक्ष चालू राहावा किंवा नाही? या याचिकेमागील कट कारस्थान तुम्ही लक्षात घ्या. हे सगळे प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा मोठा डाव आहे, आणि हा भाजपचा मोठा डाव आहे. हे भाजपचे प्यादे आहेत. यांच्या माध्यमातून भाजपवाले आमच्या पक्षाला संपवण्याचा डाव मांडत आहेत. मात्र आम्ही अशा गोष्टींना घाबरत नाही', असं त्यांनी म्हटलं.

सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जोरदार टीका:

'राज ठाकरे हिंदूविरोधी आहेत. त्यांनी उत्तर भारतीयांविरोधात अपमानास्पद वक्तव्य केलं आहे. गजवा ए हिंदसारख्या गोष्टींमध्ये मराठी लोकांना वाचवायला उत्तर भारतीयच पुढे येतील. मग तुम्ही आमच्याच विरोधात का? हिंदूंचं विभाजन थांबवा', अशी जोरदार टीका यावेळी उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केली.