मुंबई गुन्हे शाखेने कार कर्ज घोटाळा करणाऱ्या सात ज

CIBIL Scoreचा वापर करून गाड्या चोरण्याची भन्नाट शक्कल, कारची शोरूममधून खरेदी आणि काळ्या बाजारात विक्री..

मुंबई : बनावट कागदपत्रांचा वापर करून महागड्या गाड्या खरेदी केल्याच्या आरोपाखाली गुन्हे शाखा युनिट 03 ने सात संशयितांना अटक केली आहे, गुन्हे शाखेने बीएमडब्ल्यू, फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ सारख्या मॉडेल्ससह 16 वाहने जप्त केली आहेत, आरोपींना दिल्ली, मध्य प्रदेश, अहमदाबाद आणि मुंबई येथून अटक करण्यात आली आहे, ही टोळी बाजारभावापेक्षा निम्म्या किमतीत या गाड्या विकायची.

या हायटेक चोरांनी 35 हून अधिक आलिशान गाड्या चोरी केल्या होत्या. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने या गुन्ह्याचा छडा लावला. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचने आलिशान वाहनांची चोरी करणाऱ्या एका हायटेक टोळीचा भांडाफोड केला आहे. या टोळीकडून 7.3 कोटींच्या 16 आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच सात जणांना अटक करण्यात आली आहे. जीएसटी नंबरच्या माध्यमातून चांगला सिबिल स्कोअर असणाऱ्या लोकांच्या नावे गाड्या विकत घेऊन नंतर त्या काळ्या बाजारात विकण्याचा प्रकार या टोळीकडून केला जात होता. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी या टोळीला जेरबंद केले.

हेही वाचा - 'पप्पांनी मम्मीला मारलं, मग...' 4 वर्षांच्या मुलीने काढलेल्या चित्रामुळे आईच्या खुनाचा उलगडा, पोलिसही अवाक्

पोलिसांनी सांगितले की, व्यावसायिकांच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून बँक कर्ज मिळवून फसवणूक करून वाहने खरेदी करण्यात आली होती. अटक केलेल्या सात जणांनी एजंट म्हणून काम केले आणि व्यावसायिकांच्या नावावर बनावट कागदपत्रे वापरून वित्तीय संस्थांकडून वाहन कर्ज घेण्यासाठी (car loan racket) त्यांची जीएसटी नोंदणी क्रमांक, पॅन आणि आधार क्रमांक अशी काही माहिती मिळवली.

तिघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी

अटक केलेल्या आरोपींची नावे रवींद्र दीनानाथ गिरकर उर्फ​परदीप रविंदर शर्मा (47), मनीष सुभाष शर्मा (39), सय्यद नवीद सय्यद झुल्फिकार अली (52), दानिश रफिक खान (32), साईनाथ वेंकटेश गंजी (29), यशकुमार सुनीलकुमार जैन (33) आणि इम्रान अब्दुल वाहिद खान उर्फ देवा (38) अशी आहेत.

गिरकर आणि मनीष शर्मा हे कल्याणचे रहिवासी आहेत. सय्यद अली हा कुर्ला, गंजी हा भिवंडीचा रहिवासी आहे. तर, दानिश खान, यशकुमार जैन आणि इम्रान खान हे मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत. या सर्वांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती आणि सोमवारी त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडून 11 मोबाईल फोन, दोन लॅपटॉप आणि दोन पेन ड्राइव्ह जप्त केले होते.

मागच्या तीन वर्षांत आरोपींनी अशाप्रकारे 35 गाड्या चोरल्याचा संशय आहे. अटक करण्यात आलेल्या सात आरोपींपैकी तीन जणांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले. ते म्हणाले, टोळीतील सदस्य मुंबईच्या आसपासच्या भागात राहत होते. आरोपींकडून चांगला सिबिल स्कोअर असणाऱ्या लोकांचा जीएसटी क्रमांक इंटरनेटवर शोधला जायचा. चांगला क्रेडिट स्कोअर असणारी लोक हेरल्यानंतर त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड मिळवले जाई. त्यानंतर टोळीतील सदस्याचा फोटो वापरून त्या व्यक्तीचे बोगस पॅन कार्ड आणि आधार कार्ड बनविले जाई. चांगला सिबिल स्कोअर असल्यामुळे महागड्या आलिशान गाड्या घेण्यासाठी बँकेकडून कर्ज मंजूर केले जाई. आरोपींनी एक घर भाड्याने घेऊन ठेवले होते, बँकेकडून पडताळणी करण्यासाठी या घराचा पत्ता दिला जात असे. एकदा गाडी ताब्यात आल्यानंतर आरोपी त्याचे इंजिन आणि चेसी क्रमांक बदलत. तसेच बोगस आरसी बुक बनवून गाडी परराज्यात नेऊन विकली जात असे.

हेही वाचा - चक्क 400 कबुतरांची चोरी! इतकी होती किंमत.. पाळलेल्या 'या' कबुतरांमध्ये असे काय खास होते?

मोठे रॅकेट असल्याचा संशय

महिंद्रा थार वाहनासाठी महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल प्रायव्हेट लिमिटेडकडून 16 लाख रुपयांचे वाहन कर्ज घेतलेल्या गिरकरविरुद्ध पार्क साईट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ही फसवणूक उघडकीस आली. वाहनाची डिलिव्हरी झाल्यानंतर, आरोपीने मासिक ईएमआय भरणे बंद केले आणि तो गायब झाला.

'मुंबई गुन्हे शाखा युनिट 03 ला आढळले की, आरोपी एका मोठ्या रॅकेटचा भाग होता आणि त्याने महागड्या वाहनांच्या खरेदीसाठी घेतलेल्या अनेक कर्जांवर थकबाकी होती,' असे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे म्हणाले.