Mumbai Weather Update: गणपती विसर्जनासाठी मुंबई शहर सज्ज; मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता, IMD कडून यलो अलर्ट जारी
Mumbai Weather Update: शनिवारी मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज शहरातील मंडळ 10 दिवसाच्या गणेशोत्सवाच्या विसर्जनासाठी सज्ज झाली आहेत. लाखो भाविक मिरवणुकीत सहभागी होणार असल्याने भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील काही जिल्ह्यांना यलो तर पालघरला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी हवामान खात्याने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, भाविकांनी सुरक्षिततेस प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईत सतर्कतेचा इशारा
मुंबईत सकाळपासून हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या असून, दुपारनंतर आणि संध्याकाळी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कमाल तापमान 30 अंश आणि किमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पावसामुळे दमट वातावरण कायम राहील. पावसामुळे आणि गणेश विसर्जन मिरवणूकीमुळे वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो.
हेही वाचा - Pune Ganpati Visarjan 2025: गणेश विसर्जनावेळी पुण्यातील मुख्य रस्ते बंद; पर्यायी मार्ग जाणून घ्या
ठाणे-नवी मुंबईसाठी यलो अलर्ट
ठाणे व नवी मुंबईतही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून विसर्जनाची वेळ वाढू शकते. नागरिकांनी प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट
गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने प्रभावित झालेल्या पालघर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ग्रामीण भागात पाणी साचणे व वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याचा धोका आहे.
कोकणात पावसाचा इशारा
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे ठिकठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून समुद्र खवळलेला असेल. मच्छीमार व किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.