Ganesh Visarjan 2025: अनंत चतुर्दशीत मुंबई पोलिसांचा AIचा प्रयोग; विसर्जन ठिकाणी ड्रोन आणि हजारो सीसीटीव्हीने नजर
मुंबई: गणेशोत्सवाचा दहा दिवसांचा उत्सव आज अनंत चतुर्दशीच्या विसर्जनासह संपणार आहे. शहरभर लाखो भाविक घराघरातून व सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी रस्त्यावर उतरतील. या मोठ्या गर्दी आणि वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीसांनी सुरक्षा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी विस्तृत तयारी केली आहे. यंदा विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी पहिल्यांदाच अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नजर ठेवणार आहेत.
मुंबई पोलिसांनी यंदाच्या विसर्जनासाठी तब्बल 21 हजार कर्मचारी तैनात केले आहेत. यात सहा हजारांहून अधिक सार्वजनिक गणपती आणि दीड लाख घरगुती गणपतींचे विसर्जन होणार आहे. शहरात विविध ठिकाणी विसर्जनाची सोय झाली आहे, ज्यात 65 ठिकाणी नैसर्गिक आणि 205 ठिकाणी कृत्रिम पद्धतीने विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. हेही वाचा: Ganesh Visarjan Miravnuk 2025 : 'हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा...'; मुंबईसह राज्यात आज गणपती विसर्जन सोहळा रंगणार
मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाचे सर्व घटक सज्ज आहेत. सहा पोलीस आयुक्त, 40 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 3000 निरीक्षक, 15 हजार कॉन्स्टेबल, राज्य राखील पोलीस दलाच्या 14 तुकड्या, चार शीघ्र कृती दल आणि तीन दंगल नियंत्रण पथक तैनात केले गेले आहेत.
सुरक्षा वाढवण्यासाठी विसर्जन ठिकाणी 10,000 सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन कॅमेरे तैनात केले आहेत. याशिवाय AI तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दी व्यवस्थापन, अपघात टाळणे आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ प्रतिक्रिया देणे यावर लक्ष ठेवले जाणार आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, विसर्जनाच्या काळात परवानगीशिवाय कोणताही ड्रोन उडवण्यास बंदी राहणार आहे.
गणपती विसर्जनाच्या दिवशी वाहतूक व्यवस्थापनासही विशेष महत्त्व दिले जाणार आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर तात्पुरत्या वाहतूक मार्गांचे आयोजन करण्यात आले आहे, जेणेकरून विसर्जनासाठी आलेल्या भाविकांची हालचाल सुरळीत होईल. यासाठी अतिरिक्त वाहतूक पोलिस आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची तैनाती करण्यात आली आहे. हेही वाचा: Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशीचे महत्व काय ?, या दिवशी हे 5 सोपे उपाय नक्की करा, जाणून घ्या...
मुंबई पोलिसांच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या वर्षीचा विसर्जन सोहळा अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि नागरिकांसाठी आनंददायी ठरेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय नागरिकांनीही पोलीसांच्या सूचना पाळाव्यात, गर्दी टाळावी आणि आपल्या सुरक्षिततेसाठी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही तर शहरातील सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. यंदा पोलीस दलाच्या AI सहाय्यक सुरक्षा उपायांमुळे विसर्जन सोहळा अधिक नियोजित आणि सुरक्षित होणार असल्याने, नागरिकांना धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्यास संपूर्ण मोकळीक मिळेल.