Ganeshotsav 2025: गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिसांकडून ड्रोन, AI आणि विशेष दलांसह कडक बंदोबस्त; 18 हजार पोलिस तैनात
Ganeshotsav 2025: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात 27 ऑगस्ट 2025 पासून गणेशोत्सव सुरु होणार आहे. लालबागचा राजा, चिंतामणी गणेश यासारख्या प्रमुख मंडळांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे. यावेळी सुरक्षेत कोणतीही चूक होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी व्यापक आणि कडक बंदोबस्त केला आहे. यंदा गणेशोत्सव 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान चालेल, ज्यात दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस आणि सात दिवसांचे उत्सव समाविष्ट आहेत.
ड्रोन, एआय आणि विशेष दलांच्या मदतीने सुरक्षा -
मुंबई पोलिसांनी गणपतीच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत कडक सुरक्षा ठेवली आहे. गर्दी आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) तंत्रज्ञान आणि विशेष दल तैनात केले आहेत. सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले की शहरात 18 हजारहून अधिक पोलिस तैनात केले जातील.
हेही वाचा - Manoj Jarange: मराठा आरक्षण लढ्याला ब्रेक? जरांगेंच्या आंदोलनाला कोर्टाचा रेड सिग्नल
11 हजारहून अधिक CCTV आणि ड्रोन निगराणी -
शहरातील 11 हजार हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळे आणि गर्दीच्या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे 24 तास लक्ष ठेवले जाईल. याशिवाय, शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात 11 हजार हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत राहतील. लालबागचा राजा आणि इतर प्रमुख मंडळांसाठी 500 हून अधिक पोलिस, श्वान पथके आणि बॉम्ब शोधक दल तैनात केले जातील.
विसर्जन स्थळांवर अतिरिक्त बंदोबस्त -
दरम्यान, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, शिवाजी पार्क, मालवणी आणि इतर प्रमुख विसर्जन स्थळांवर 450 मोबाईल पेट्रोलिंग व्हॅन आणि 350 बीट मार्शल गस्त करतील. मुख्य विसर्जनाच्या दिवशी 5000 अतिरिक्त पोलिस तैनात केले जातील. तथापी, महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
वाहतूक आणि आवाजावर निर्बंध
कुलाबा, मरीन ड्राइव्ह, गिरगाव, दादर, शिवाजी पार्क, लालबाग, परळ, भायखळा आणि बोरिवली येथे वाहतूक बंद किंवा वळवली जाईल. विसर्जनाच्या दिवशी 24 तास वाहतूक बंदी असेल. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत 50 डेसिबलपेक्षा जास्त आवाजावर बंदी आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
मुंबई पोलिसांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आणि संशयास्पद हालचाली तात्काळ कळवण्याचे आवाहन केले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत 100 किंवा 112 वर संपर्क साधावा, अशी सूचनाही पोलिस विभागाकडून देण्यात आली आहे.