“मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी तणाव: शेतकऱ्यांचा जमिनी संपादनाला विरोध”
मुंबई: मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीवरून तलासरी तालुक्यात तणाव निर्माण झाला आहे. कोचाई बोरमाळ येथे प्रचंड पोलीस बंदोबस्तात महामार्गाच्या उभारणीचं काम सुरू असताना स्थानिक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला आहे. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, शासनाने अद्याप योग्य भरपाई दिलेली नाही आणि पैसे न देता जमिनी संपादित केल्या जात आहेत.
शेतकऱ्यांच्या मते, जमिनीच्या संपादनासाठी त्यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. शासनाने चर्चा किंवा योग्य तोडगा काढण्याऐवजी जबरदस्तीने काम सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.दसरीकडे, प्रशासनाकडून याबाबत कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. महामार्ग उभारणीसाठी हे काम महत्त्वाचं असल्याचं सांगत प्रशासनाने कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
शेतकऱ्यांनी मात्र, आपले हक्क मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. हा वाद वाढल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. शासनाने शेतकऱ्यांशी संवाद साधून तात्काळ न्याय्य तोडगा काढावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.