ईदचा उत्साह मावळला; ना कपडे घेतले, ना सण साजरा केला मस्साजोगचे मुस्लीम बांधव धनंजय देशमुखांच्या गळ्यात पडून रडले
मस्साजोग: रमजान ईद हा प्रेम, बंधुत्व आणि मदतीचा सण म्हणून ओळखला जातो. मात्र, यंदा बीडच्या मस्साजोग गावात हा आनंद मावळला. गावाचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येमुळे मुस्लिम समाजाने ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी मोठ्या उत्साहाने ईद साजरी करणाऱ्या मुस्लिम बांधवांनी यंदा शीरखुर्मा बनवला नाही, लेकरांना नवीन कपडे घेतले नाहीत, आणि सणाच्या दिवशी देशमुख कुटुंबाच्या भेटीसाठी गेले.
गावाच्या भल्यासाठी झटणाऱ्या संतोष अण्णांच्या आठवणीने संपूर्ण मस्साजोग शोकमग्न झाले. मुस्लिम बांधवांनी ईदच्या दिवशी प्रार्थना केली मात्र कोणत्याही प्रकारचा आनंद साजरा केला नाही. त्यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली, आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले. 'अण्णा असते तर आम्ही आज त्यांच्या घरी ईदच्या शुभेच्छा द्यायला गेलो असतो,' असे सांगताना भावनांचा बांध फुटला.
हेही वाचा: वक्फ सुधारणा विधेयक 2 एप्रिलला संसदेत मांडण्याची शक्यता
संतोष देशमुख हे जाती-धर्माच्या भेदभावापलीकडे जाऊन कार्य करणारे नेतृत्व होते. त्यांच्या आठवणींना श्रद्धांजली म्हणून गावातील 20-25 मुस्लिम कुटुंबांनी ईदचा आनंद टाळला. त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मात्र पुढाकार घेत मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. 'अण्णांची आठवण प्रत्येकाच्या मनात आहे, पुढच्या वेळी त्यांच्यासाठी मोठ्या उत्साहात ईद साजरी करू,' असे सांगताना गावकऱ्यांचे डोळे पाणावले.