नागपूर पोलिसांची 'ऑपरेशन थंडर' मोहीम जोरात; अमली पदार्थ तस्करी विरोधात पोलीस अलर्ट
नागपूर: गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात अवैधरित्या अमली पदार्थांची तस्करी केली जात आहे. त्यामुळे, अवैधरित्या चालणाऱ्या अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी नागपूर पोलिसांनी 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत एका महिन्यात धडक कारवाई करत तब्बल 28 ठिकाणी रेड टाकून 1 किलो 400 ग्रॅम एमडी, 17 किलो गांजा आणि अफू असा 1 कोटी 31 लाख 56 हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. तसेच, या कारवाईमध्ये 47 आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली गुन्हेगारांविरोधातील ही मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे.
व्यवस्थेतील हलगर्जीपणा थांबावण्यासाठी पोलिस आयुक्तांनी तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 19 मे रोजी त्यांनी जरीपटका आणि यशोधरा नगर भागात अचानक भेट देऊन गस्त घातली. यावेळी खोब्रागडे चौकातील एका पानठेल्यात बेकायदेशीर गुटखा विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे, संबंधित पानठेला चालकाकडून राजश्री, विमल, रजनीगंधा, बाबा, केपी ब्लॅक लेबल सारखे फ्लेवर्ड तंबाखू आणि गुटखा जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा: विजेचा धक्का बसून 10 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू
यानंतर, डॉ. सिंगल यांनी स्थानिक वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण शिरसागर यांना तात्काळ फटकारले आणि अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच, रस्त्यावर गर्दी करणाऱ्या वाहनचालकांवर, वाइन शॉपजवळ अंडी विकणाऱ्यांवर आणि प्लास्टिक ग्लास विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांना हटवण्यात आले. त्यानंतर, त्यांनी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात अचानक भेट देऊन त्यांनी तिथल्या कामाचा आढावा घेतला. त्यासोबतच, दारू तस्कर, वेश्याव्यवसाय करणारे लोक, गुटखा विक्रेते आणि गुंडगिरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली.
पोलीस आयुक्तांचा स्पष्ट इशारा:
'जर आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करू शकतो, तर स्थानिक वरिष्ठ अधिकारी का नाही?', असं पोलीस आयुक्तांनी स्पष्ट संदेश दिला आहे. त्यांचा हा दृष्टिकोन पोलिस विभागातील हलगर्जीपणाला धक्का देणारा आहे आणि नागपूर पोलिस दलाला पुन्हा एकदा विश्वासार्हतेच्या मार्गावर घेऊन जात आहे.