दोन समाजात ताण-तणाव निर्माण होईल असे पोस्ट केल्यास

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास थेट तुरुंगात

यवतमाळ: सोमवारी, 17 मार्च 2025 रोजी राज्यभरात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद निर्माण झाला होता. यादरम्यान, नागपुर शहरात हिंसाचार पाहायला मिळालं. जमावाने पोलिसांवर दगडफेक करत वाहने पेटवली. यामुळे, तिथल्या नागरिकांचे खूप नुकसान झाले. त्यामुळे, नागपुर शहरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभुमीवर कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जातील किंवा दोन समाजात तेढ पसरविणारे आक्षेपार्ह मॅसेज, इमेजेस, व्हिडीओज यांची शहानिशा न करता सोशल मीडियावर पोस्ट प्रसारित करू नये. त्यासोबतच, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये किंवा शेअर करू नये. दोन समाजात ताण-तणाव निर्माण होईल असे पोस्ट केल्यास किंवा पसरवल्यास त्या संबंधित व्यक्तीवर गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याचे समजून त्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा इशारा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिला आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात बंदोबस्त:

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त नेमण्यात आले असून सर्व पोलीस दल सतर्क आहेत. यादरम्यान, सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल स्थगन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व सोशल मीडिया माध्यमांवर पोलिस प्रशासन बारकाईने लक्ष ठेवत आहेत. 

आक्षेपार्ह पोस्ट केल्यास थेट तुरुंगात:

नागपूर शहरात झालेल्या घटनेवर खोटे मेसेज किंवा अफवा सोशल मीडियावर पसरवल्यास किंवा दोन समाजात तणाव निर्माण होईल अशा पोस्ट व्हायरल करणाऱ्या व्यक्तीला किंवा व्हाट्सअप ग्रुपच्या ॲडमिनला जबाबदार धरण्यात येईल. त्यासोबतच, संबंधित व्यक्तीला तुरुंगात जावे लागेल. यवतमाळ जिल्ह्यामध्ये शांतता राखण्यासाठी आणि पोलीस दलास सहकार्य करण्याचे आवाहन पोलीसांनी दिले आहे. 

पोलीसांनी शांतता राखण्याचं आवाहन दिलं:

नागपूरमधील चिटणीस पार्क परिसरात घडलेल्या हिंसाचार घटनेमुळे मंगळवारी, 18 मार्च 2025 रोजी रूट मार्च काढत शांततेचं आवाहन दिलं. नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली हिंसाचार झालेल्या परिसरात रूट मार्च काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासोबतच, शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. प्रशासनाने सर्वांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले असून, कोणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे निर्देश पोलीसांनी दिले आहेत.