Jalgaon Crime : सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने संपवले जीवन
जुगल पाटील, प्रतिनिधी, जळगाव: जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेने स्वत:चे जीवन संपवले. ही घटना जळगावच्या सुंदरमोती नगर येथे घडली आहे. पैशांची मागणी करत तिचा छळ केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निश्चय पीडितेच्या नातेवाईकांनी घेतला आहे. या निर्णयामुळे, जिल्हा रुग्णालयात ताणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
नेमकं प्रकरण काय?
10 मे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील पडाळी येथील मयुरी गौरव ठोसरचा (वय: 23) विवाह गौरव ठोसरसोबत झाला होता. लग्नाच्या काही दिवसांतच, मयुरीच्या सासरच्यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली, तसेच पैशांची मागणीही केली जात होती. मयुरीचा वाढदिवस 9 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला होता. पण दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी दुपारी घरात कुणी नसताना तिने गळफास घेऊन स्वत:चे जीवन संपवले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेनंतर, 11 सप्टेंबर रोजी मयुरीचे वडील भगवान बुडूकले आणि कुटुंबीय जळगावात दाखल झाले. त्यांनी सासरच्या लोकांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. तसेच, मृत मयुरीचा पती गौरव ठोसरसह, सासू, सासरे, दीर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. आरोपी अटकेपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, असा ठाम पवित्रा मयुरीच्या नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता.