'देशात गरीबी वाढत आहे आणि काही श्रीमंत लोकांच्या ह

'देशात गरीबी वाढत आहे आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये' - नितीन गडकरी

नागपूर: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील श्रीमंत आणि गरीब यांच्यातील वाढत्या दरीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 'देशात गरीबी वाढत आहे आणि काही श्रीमंत लोकांच्या हातात संपत्ती चालली आहे', अशी चिंता नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. 'अर्थव्यवस्थेचे केंद्रीकरण होता कामा नये आणि संपत्तीचेही विकेंद्रीकरण व्हायला हवे', अशी प्रतिक्रिया गडकरींनी दिली. नागपूर येथे सीएच्या विद्यार्थ्यांसाठी एक राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी 'देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यांवर' आणि 'संपत्तीचे मोजक्या श्रीमंताकडे होत असलेले केंद्रीकरण' या मुद्द्यांवरही भाष्य केले. 

काय म्हणाले नितीन गडकरी?

नागपूर येथे सीएच्या विद्यार्थ्यांसाठी एक राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले की, 'आता लोक असा प्रश्न विचारत आहेत की आपल्या विकासासाठी आर्थिक विचारसरणीची आवश्यकता आहे. अमेरिकेने उदारमतवादी आर्थिक धोरण स्वीकारले. पण, ते मॉडेलही अपयशी ठरले आहे. आपल्या देशात अशी चर्चा आहे की आपण काय करायला हवे?'.

'आपले उद्दिष्ट हे आहे की, गरिबांची गरिबी दूर करणारा, तरुणांना रोजगार निर्मिती करणारा, देशाची संपत्ती वाढवणारा आर्थिक पर्याय आपल्याला हवा आहे. त्यामुळे साहजिकच नरसिंहराव आणि मनमोहन सिंगजी यांनी उदारमतवादी अर्थव्यवस्थेचं धोरण स्वीकारले. हे स्वीकारले, पण आपल्याला विचार करावा लागेल की, अर्थव्यवस्थेचे केंद्रीकरण होता कामा नये', असं नितीन गडकरींनी म्हणाले. 

हेही वाचा: पुढील 48 तासात राज्यातील 'या' जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस

पुढे गडकरी म्हणाले की, 'हळूहळू गरिबांची संख्या वाढत आहे आणि काही श्रीमंत लोकांच्या हातात संपत्तीचे केंद्रीकरण होत आहे. हे होता कामा नये. सत्तेचे विकेंद्रीकरण व्हायला हवे, संपत्तीचेही विकेंद्रीकरण व्हायला हवे. आर्थिक स्थितीमध्ये खूप मोठे बदल झाले आहेत, त्यात सीएची भूमिका खूप महत्त्वाची आहे'. 

'जीडीपीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील योगदान समान नाहीये. जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा 22 ते 24% आहे. सेवा क्षेत्राचा 52 ते 54%, तर कृषि क्षेत्राचा वाटा फक्त 12% आहे. यात 65 ते 70% ग्रामीण लोकसंख्या आहे', भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना नितीन गडकरी म्हणाले.