Maharashtra Budget Session 2025: अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जिंतेंद्र आव्हाड यांनी हातात बेड्या घालून अनोख्या पद्धतीने नोंदवला फडणवीस सरकारचा निषेध
Maharashtra Budget Session 2025: महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, यावेळी राष्ट्रावादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हातात बेड्या घालून विधिमंडळात एन्ट्री केली. त्यांना अशा पद्धतीने पाहून सर्वांनाचं आश्चर्य वाटलं. त्यानंतर त्यांनी हातात बेड्या घालण्यामागचं कारण स्पष्ट केलं. देशात तसेच राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य चिरडले जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो घाला घातला जातोय, ज्या पद्धतीने व्यक्त होणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांचे आवाज बंद केले जात आहेत, ती पद्धत चुकीची आहे. व्यक्त होणे आमचा संवैधानिक अधिकार आहे. आम्हाला व्यक्त होता आलच पाहिजे. आमचे मूलभूत अधिकार शाबूत राहिले पाहिजेत म्हणून या बेडया घातल्या आहेत, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
भारतातील काही लोक अमेरिकेला श्रीमंत होण्यासाठी जात आहेत. परंतु, त्यांच्यावर तेथे अन्याय होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आखलेल्या धोरणामुळे अनेक भारतीयांचे घर-संसार उद्धवस्त झाले. ज्या प्रकारे भारतीयांना एक-दोन विमानात कोंबून भारतात पाठवलं जातय, पायात साखळदंड, हातात हतकड्या, आदी हा भारतीयांचा अपमान करण्याचा प्रकार होता. अमेरिकेत जाऊन मोठ होण्याची स्वप्न बघणाऱ्या मराठी माणसाची स्वप्न उद्धवस्त होताना दिसतं आहेत, असंही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केलं.
हेही वाचा - सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण – धनंजय मुंडेंना क्लीनचिटचे संकेत
जितेंद्र आव्हाडांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी -
दरम्यान, माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, जर आपण अमेरिकेच्या अन्यायाविरोधात व्यक्त होणार नसू तर अमेरिका आपल्याला गिळून टाकेल. अमेरिकेत आपले काही बांधव यातना भोगत आहेत. त्यासाठी या बेड्या घातल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं. तथापि, पत्रकारांनी या बेड्या धनंजय मुंडे यांना घातल्या जाव्यात का? असा प्रश्न विचारला यावर आव्हाड म्हणाले की, ते सरकारच्या मनावर आहे. संतोष देशमुख यांचा खून त्यांनी केला नाही. वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्तेचे मास्टरमाइंड आहेत. कराड धनंजय मुंडे यांचा खास माणूस आहे. जर तसं असेल तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही जितेंद्र आव्हाड यांनी केली.