Police Recruitment 2025: 'आता वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही...', पोलीस भरतीबाबत सरकारचा मोठा निर्णय
Police Recruitment 2025: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या काळात राज्यात सुमारे 15 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळात या भरतीला मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर आता 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना सरकारने दिलासा दिला आहे. या उमेदवारांना आता आणखी संधी देण्यात येणार आहे.
वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांना मिळणार संधी राज्य सरकारने 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा संपलेल्या तरुणांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे तरुणांना आणखी एक संधी मिळाली आहे. गृह विभागाने 10 सप्टेंबर 2025 रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. लाखो तरुणांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
कोरोना आणि त्यानंतर काही कारणास्तव पोलीस भरतीची प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थी आणि विविध संघटनांनी वयोमर्यादा वाढवण्याची मागणी केली होती. यामुळे आता सरकारकडून अशा तरुणांना एक संधी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने नुकतच पोलीस दलातील 15 हजार 631 पदभरतीचा शासन निर्णय जारी केला आहे. या अंतर्गत पोलीस दलातील पदे शंभर टक्के भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आता जानेवारी 2024 पासूनची रिक्त पदे भरली जाणार आहेत. यात आता वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांनाही अर्ज करता येणार आहे.
कोणकोणत्या पदासाठी भरती प्रक्रिया होणार? सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार आता पोलीस शिपाई पदासाठी 12 हजार 399 जागांची भरती होणार आहे. तर पोलीस शिपाई चालक पदाच्या एकूण 234 जागा भरल्या जाणार आहेत. बॅण्ड्समन पदाच्या एकूण 25 जागा भरल्या जाणार आहेत. तर सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या एकूण 2 हजार 393 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. कारागृह शिपाई 580 पदे अशी मिळून 15 हजार 631 पदे भरली जाणार आहेत.