भाजपाच्या माजी खासदारांना राम मंदिरात प्रवेश करण्यास पुजाऱ्याने रोखले
देवळी शहरातील राम मंदिरात रामनवमीचे औचित्य साधून भाजपाचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार रामदास तडस व त्यांच्या पत्नी शोभा तडस हे दर्शनासाठी गेले असताना पुजा-याने माजी खासदार रामदास तडस यांना तुम्ही जानवे घालून नाही, मग तुम्हाला मंदिराच्या गाभा-यात जाता येणार नाही असे सांगत माजी खासदार तडस यांना मंदिराच्या गाभा-यात जात पूजा करण्यास रोखले. या घटनेमुळे माजी खासदार रामदास तडस यांच्या समर्थकांत संतापाची लाट पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, माजी खासदार रामदास तडस, माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी तथा माजी नगराध्यक्ष शोभा तडस, नगरसेवक नंदू वैद्य व काही भाजपाचे पदाधिकारी देवळी येथील राम मंदिरात दर्शनासाठी गेले होते. माजी खासदार रामदास तडस हे पूजा करण्यासाठी मंदिराच्या गाभा-यात जात असताना त्यांना तेथे एका पुजा-याने त्यांना मज्जाव केला. प्रवेशासाठी मज्जाव का अशी विचारणा केल्यावर भगवान रामाच्या मूर्तीजवळ प्रवेश करताना सोवळे, जानवे परिधान करणे गरजेचे असल्याचे सांगून ते तुम्ही ते परिधान केले नाही असे कारण पुजा-याने पुढे केले. त्यानंतर माजी खासदार रामदास तडस यांनी मंदिराच्या गाभा-या बाहेरूनच हारअर्पण करून प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. माजी खासदारांना मंदिराच्या गाभा-यात जात पूजा करण्यास मज्जाव करण्यात आल्याने मंदिर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे माजी खासदार रामदास तडस यांच्या समर्थकांत संतापची लाट उसळली आहे.
एकेकाळी हरीजनांना मंदिरात प्रवेश नाकारला जात होता. संबंधित परिस्थिती लक्षात आल्यावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अस्पृश्यता निर्मूलनाच्या उद्देशाने मंदिर, सार्वजनिक विहिरी आणि शाळा यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी समान प्रवेशासाठी आवाज उठवला. तर सध्याच्या विज्ञान युगात रविवारी देवळीच्या राम मंदिराच्या गाभा-यात माजी खासदार रामदास तडस यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने देवळीकरांत संतापाची लाट उसळली आहे.