'राहुल गांधींच्या मेंदूची चिप चोरी झालीय'; देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींवर निशाणा
मुंबई: काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे. कर्नाटकातील एका विधानसभेच्या जागेच्या उदाहरणाचा दाखला देत राहुल गांधी यांनी मतदार यादीत फेरफार केल्याचा, तसेच मतदान चोरी झाल्याचा दावा केला. या दाव्यावर सत्ताधारी पक्षांकडून टीकेची झोड उठली आहे. राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
राहुल गांधींची ब्रेन चिप चोरीला गेली -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, राहुल गांधींनी महाराष्ट्रात निवडणूक चोरीचा आरोप केला आहे. 'मला वाटते त्यांची ब्रेन चिपच चोरीला गेली आहे. सतत खोटी विधाने करून ते जनतेची दिशाभूल करत आहेत. गेल्यावेळी त्यांनी म्हटले होते की 75 लाख मते वाढली. आता ते म्हणतात 1 कोटी. इतके मोठे आरोप करताना कोणताही ठोस पुरावा नाही. हे सगळं केवळ पराभव झाकण्यासाठीच आहे. त्यांचा पक्ष आज अस्तित्वहीन झालेला आहे,' असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - 'लोकांचा मतदार यादीवर विश्वास नाही...'; राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर पुराव्यांसह उपस्थित केले गंभीर प्रश्न
एकनाथ शिंदे यांचीही प्रतिक्रिया
दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राहुल गांधींच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, राहुल गांधी खोटे आरोप करून जनतेच्या मनात संशय निर्माण करू पाहत आहेत. मात्र जनता अशा आरोपांना बळी पडणार नाही.
हेही वाचा - ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण म्हणजे 'आर्थिक ब्लॅकमेलिंग'; राहुल गांधींनी मोदींना दिला 'हा' सल्ला
राहुल गांधी नेमकं काय म्हटले?
राहुल गांधी यांनी दावा केला की, कर्नाटकातील एका विधानसभा मतदारसंघात त्यांनी सहा महिन्यांच्या मेहनतीनंतर असे पुरावे गोळा केले आहेत की मतदार यादीत फेरफार करून हजारो मतदारांची नावे हटवण्यात आली. यामागे एक संगनमत आहे आणि निवडणूक आयोग देखील याकडे दुर्लक्ष करत आहे.