पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला संवेदनशील माहिती पुरवल्याबद्दल ठाण्यातून एका व्यक्तीला अटक
मुंबई: राज्याच्या एटीएसने (दहशतवादविरोधी पथकाने) एक मोठी कारवाई केली आहे. भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्राबद्दल गोपनीय माहिती पाकिस्तानी तपास संस्थांना पुरवल्याप्रकरणी ठाण्यातून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान अशी माहिती समोर आली आहे की नोव्हेंबर 2024 पासून आरोपी पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात होता. फेसबुकद्वारे या आरोपीची ओळख पीओआयशी संबंधित एका व्यक्तीसोबत झाली होती. त्यानंतर, तपासात असे दिसून आले की 2024 ते 2025 पर्यंत आरोपीने भारताने प्रतिबंधित क्षेत्राची गोपनीय माहिती सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानला दिली होती. देशाविरुद्ध देशद्रोह करणारा आरोपी ठाण्याचा असून एटीएसकडून त्याची अधिक चौकशी केली जात आहे.
दहशतवादविरोधी पथकाने संबंधित व्यक्ती आणि या प्रकरणात त्याच्या संपर्कात असलेल्या पीओआयमधील इतर 2 व्यक्तींविरुद्ध पीओआयला राष्ट्रीय हिताची गोपनीय माहिती पुरविल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. तसेच, दहशतवादविरोधी पथकाने भारतीय दंड संहिता, 2023 च्या कलम 3 (1), बी, 5 (अ), कलम 61(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दहशतवादविरोधी पथक पुढील तपास करत आहे. दरम्यान, संशयित आरोपी मूळचा ठाण्याचा आहे.
हेही वाचा: नागपूरच्या जैस्वालनगरमधील घटना; बेडच्या उशीखाली नाग आल्याने खळबळ
कोण आहे रविंद्र वर्मा?
पाकिस्तानी तपास संस्थांना पुरवल्याप्रकरणी या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीचे नाव आहे रविंद्र मुरलीधर वर्मा. सूत्रांनुसार, रविंद्र वर्मा (वय: 25) संरक्षण दलात एका छोट्या पदावर कार्यरत आहे. मात्र, एटीएस अधिकारी विचारत आहेत की वर्माने देशाचा विश्वासघात का केला असावा? त्याने हा विश्वासघात पैश्यासाठी केला असावा? किंवा हनीट्रॅपद्वारे रविंद्र वर्माला आमिष दाखवण्यात आले का? याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.