आरटीई अंतर्गत ३ लाख अर्जांमधून १ लाख विद्यार्थ्यांची आरटीई प्रवेशासाठी निवड
१ लाख विद्यार्थ्यांना 'आरटीई' अंतर्गत प्रवेश
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशप्रक्रियेत सोडतीद्वारे 1 लाख 1 हजार 916 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 14 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत प्रवेश निश्चित करता येणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ही माहिती दिली.
आरटीईअंतर्गत दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी (विनाअनुदानित) शाळा आणि महापालिकेच्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांतील 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो. यंदा राज्यातील 8 हजार 853 शाळांमध्ये 1 लाख 9 हजार 87 जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी 3 लाख 5 हजार 152 अर्ज दाखल झाले. त्यामुळे प्रवेशासाठी 10 फेब्रुवारी रोजी ऑनलाइन सोडत काढण्यात आली. त्यात 1 लाख 1 हजार 916 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कागदपत्रांची पडताळणी समितीकडून प्राथमिक तपासणी करण्यात येईल. योग्य कागदपत्रे असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाइन नोंद करण्यात येईल.
आरटीई प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने, नियमानुसार राबवली जात आहे. पालकांनी प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये. गैरप्रकार निदर्शनास आल्यास depmah2@gmail.com व educommoffice@gmail.com या ई-मेलवर अथवा प्रत्यक्ष पुराव्यासह तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.