Sambhajinagar: मोसंबीच्या दरात मोठी घसरण; शेतकऱ्यांना एका टनामागे तब्बल दहा हजार रुपये नुकसान
विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: एकीकडे वातावरणातील बदलासह मोसंबीच्या फळावर बुरशीजन्य मगरी रोग पडल्याने मोसंबीला गळती लागली असतानाच दुसरीकडे बाजारात मोसंबीचे दर मोठ्या प्रमाणावर पडले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या पाचोड येथील मोसंबीच्या बाजारपेठेत आवक वाढली. मात्र परराज्यात पाऊस सुरू असल्याने मोसंबीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आठवड्याभरात मोसंबीचे दर 20 हजारांहून 10 हजारांवर आल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना एका टना मागे तब्बल दहा हजार रुपये आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. सध्या पाचोड येथील मोसंबीच्या बाजारपेठेमध्ये दररोज तीनशेहून अधिक टन मोसंबी विक्रीसाठी येत आहेत.
गेल्या काही वर्षात पाचोड येथील मोसंबीच्या बाजारपेठेमध्ये वाढती आवक पाहता, राज्यभरातील प्रमुख बाजारांपैकी एक महत्वाचा बाजार म्हणून या मार्केटकडे पाहिले जात आहे. पाचोडच्या गोड व रसवंत मोसंबीला दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, जयपूर, कानपूर, हैद्राबाद, कर्नाटक, कलकत्ता, मुंबई, पुणेसह परदेशात देखील मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे येथील मोसंबी खरेदीला परराज्यातील व्यापारी ठाण मांडून असतात. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडसह इतर जिल्ह्यातील शेतकरी या बाजारात माल विकण्यासाठी प्राधान्य देतात. मोसंबीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यामुळे बाग विक्रीची मागणी वाढली आहे. याचाच फायदा व्यापारी घेताना पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा: Buldhana Crime: प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या;हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
गळ सुरु झाल्याने आवक वाढली शेतकऱ्यांच्या मोसंबीला सध्या गळ सुरु झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. नुकसानीपासून वाचण्यासाठी शेतकरी पाचोडच्या मार्केटमध्ये मोसंबी आणत आहेत. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मोसंबीला कमी भाव मिळत असल्याचे व्यापारी शिवाजी भालसिंगे यांनी सांगितले. सुरुवातीला मोसंबीला चांगला भाव असल्याकारणांमुळे व्यापाऱ्यांने शेतकऱ्यांची मोसंबी 15 हजार रूपये ते 19 हजार रूपये या भावाने मोसंबी खरेदी केली आहे. मात्र आज तीच मोसंबी 10 हजार ते 12 हजार रूपये टनांने दिल्लीसह आदी बाजारपेठ विक्री होत असल्याने व्यापारी वर्गही संकटात सापडला आहे. यावर्षी मोसंबीला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यातच आता मगरी रोगाने मोसंबीवर आक्रमण केल्याने मोसंबीच्या फळांची मोठ्या प्रमाणात गळ होऊ लागली असल्याने मोसंबी विक्रीसाठी बाजारपेठेत घेऊन जावे लागत आहेत. परंतु सध्या परराज्यात पाऊस पडत असल्याने मोसंबी बेभाव विक्री करावी लागत आहे.