शहरात 'जीबीएस' रुग्णांची संख्या पाचवर, दोन बालकांव

छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात जीबीएसचा नवीन रुग्ण आढळला

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात गुइलेन-बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचा आणखी एक नवा रुग्ण दाखल झाला आहे. यामुळे सध्या घाटी रुग्णालयात या आजाराचे पाच रुग्ण उपचार घेत आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये दोन बालकांचा समावेश असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. घाटीतील मेडिसीन विभागात तीन रुग्णांवर तर बालरोग विभागात दोन रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.

👉👉 हे देखील वाचा : मुस्लिम विद्यार्थ्यांचा बुरख्यावरून संताप: "आम्ही कॉपीसाठी नाही, सुरक्षेसाठी बुरखा घालतो!"

मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले की, "जीबीएस हा आजार योग्य वेळी निदान आणि त्वरित उपचार घेतल्यास नियंत्रणात आणता येतो. रुग्ण जितक्या लवकर रुग्णालयात दाखल होईल, तितक्या लवकर त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसते. त्यामुळे या आजाराची वाढ रोखण्यासाठी वेळीच उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे."

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

मनपाची आरोग्य यंत्रणा सतर्क शहरात जीबीएसचा रुग्ण आढळल्याने महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "जीबीएस हा नवा आजार नसून नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. मात्र, काळजी घेणे गरजेचे आहे. चालताना त्रास होणे, अशक्तपणा जाणवणे, हातापायांना मुंग्या येणे, हातापायांची ताकद कमी होणे, डायरिया, बोलताना किंवा अन्न गिळताना अडथळा निर्माण होणे यांसारखी लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा."

आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत सांगितले की, कोणतीही लक्षणे दिसल्यास विलंब न करता तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत. यासोबतच वैयक्तिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे आणि इतर संसर्गजन्य आजारांपासून सावध राहावे.