'पैशाची चिंता नाही, एखादी बॅग... ; मंत्री संजय शिरसाटांचा आणखी एक व्हिडिओ समोर
छत्रपती संभाजीनगर: मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. 'पैशांची चिंता करू नका, एखादी बॅग पाठवून देऊ,' असं विधान त्यांनी कॅन्सर हॉस्पिटलच्या एका कार्यक्रमात केलं. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, विरोधकांनी यावर जोरदार टीका सुरू केली आहे.
संजय शिरसाट यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितलं की, 'पैशांसाठी काही अडत नाही, पैसे देणारे आम्हीच आहोत. आज आमचं नाव खूप चालतंय. त्यामुळे पैशांची चिंता सोडा, बॅग पाठवून देतो.' त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी मिश्किल टिप्पणी केली असली तरी, काहींनी याला गंभीरपणे घेतलं आहे. हेही वाचा: हातात सिगारेट, बाजूला पैशांची बॅग, संजय शिरसाटांचा व्हिडीओ व्हायरल; राऊतांचे गंभीर आरोप
याआधी आणखी एक व्हिडीओ समोर आला होता, ज्यामध्ये शिरसाट एका बेडवर बसून सिगारेट ओढताना दिसतात. त्यांच्या बेडखाली एक मोठी बॅग असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. याच व्हिडीओवरून शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी थेट आरोप केला की,'मंत्री पैशांच्या बॅगेसोबत बसले आहेत.' राऊतांच्या या आरोपामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण तापलं होत.
मात्र, शिरसाट यांनी हा व्हिडीओ खोटा किंवा अपप्रचार असल्याचं सांगितलं आहे. 'हा व्हिडीओ माझ्या घरातील आहे. तुम्ही पाहत असलेली जागा माझी बेडरूम आहे. बाजूला माझा कुत्रा आहे. बॅग ही कपड्यांची आहे, पैशांची नाही. एवढी मोठी बॅग जर पैशांसाठी असेल, तर कपाट कुठं गेलं?' असं प्रत्युत्तर शिरसाट यांनी दिलं आहे. त्यांनी यामागे विरोधकांचा षड्यंत्र असल्याचा आरोप करत सांगितलं की, 'मला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.'
या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राजकारणात 'पैशांची बॅग' चर्चेचा मुद्दा ठरला असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र रंगत आहे. मंत्री शिरसाट यांचं हे वक्तव्य आणि व्हिडिओ पुढील राजकीय घडामोडींना किती प्रभावीत करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.