सरपंचाने केला महिला सदस्याचा विनयभंग; घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत ओढला पदर
अमरजित सिंह पाटील. प्रतिनिधी. कोल्हापूर: गांधीनगर गावातील सरपंच संदीप पाटोळे यांनी विरोधी पक्षातील मागासवर्गीय महिला ग्रामपंचायत सदस्य रीना अभिजीत अवघडे यांना अक्षरशः घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर, संदीप पाटोळे यांनी महिलेच्या अंगावर धावून त्यांचा पदर ओढून लज्जा उत्पन्न करणारे कृत्य केले. यामुळे तिसऱ्या दिवशी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सरपंच संदीप पाटोळे फरारी आहेत.
सरपंचाने केला महिला सदस्यांचा विनयभंग:
करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या प्रभाग क्रमांक तीन मधील मागासवर्गीय प्रवर्गातून रीना अभिजीत अवघडे या सदस्य म्हणून निवडून आल्या. मात्र, सरपंच संदीप पाटोळे हे विरोधी गटाचे असल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी रीना अवघडे यांच्या जागेचा फाळा भरून घेतला नाही. ज्यामुळे रीना अवघडे ग्रामपंचायतीमध्ये गेल्या होत्या. यादरम्यान, सरपंच संदीप पाटोळे आणि काहीजण सरपंच केबिनमध्ये बसले होते. तेव्हा, 'आमचा फाळा भरून घ्यावा आणि आम्हाला पावती द्या', अशी विनंती रीना अवघडे यांनी सरपंच संदीप पाटोळेकडे केली. मात्र, विरोधी सदस्य असल्यामुळे संतापलेल्या सरपंच संदीप पाटोळे यांनी रीना अवघडे यांना रागाच्या भरात, 'तुझा फाळा भरून घेत नाही, तुला काय करायचं आहे ते कर', असं बोलून अक्षरशः शिवीगाळ सुरू केली.
अंगावर धावून सरपंचाने ओढला महिलेचा पदर:
शिवीगाळ करून एवढ्यावरच थांबता, सरपंच संदीप पाटोळे यांनी रीना अवघडे यांच्या अंगावर धावून त्यांचा पदर ओढला आणि लज्जा उत्पन्न करणारे कृत्य केले. त्यानंतर, रीना अवघडे यांनी स्वसंरक्षणासाठी सरपंच संदीप पाटोळे याचा गळा धरला. तोपर्यंत तिथे उपस्थित लोकांनी रीना अवघडे यांना बाहेर काढून दरवाजा झाकला.
रीना अवघडे यांनी गाठले थेट गांधीनगर पोलीस ठाणे:
सरपंचाने लज्जा उत्पन्न करणारे कृत्य केल्यामुळे रीना अवघडे यांनी थेट गांधीनगर पोलीस ठाणे गाठले आणि घडलेली घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तक्रार टायपिंग करून घेतली. त्यानंतर, सरपंच संदीप पाटोळे यांना पोलीस ठाण्यात आणले. पण, सायंकाळी सात वाजता त्यांना घरी पाठवून दिले. मात्र, अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी सही घेतल्यास टाळाटाळ केली. त्यानंतर, पोलिसांनी हे प्रकरण आपापसात मिटवण्याची सूचना दिली. सदर प्रकार दोन दिवसानंतर, तिसऱ्या दिवशी गुरुवारी रात्री दहा वाजता अधिकाऱ्यांची कान उघडणी झाली. ज्यामुळे क्षणाचाही विलंब न करता गांधीनगर पोलिसांनी तक्रार दाखल केली.
'या' कारणामुळे सरपंच संदीप पाटोळे फरार:
तक्रार दाखल करण्यास तीन दिवस लागल्यामुळे सरपंच संदीप पाटोळे याला फरार होण्याची संधी मिळाली. एका मागासवर्गीय महिला ग्रामपंचायत सदस्याचा अवमान करून लज्जा उत्पन्न करणाऱ्या सरपंचाला पोलीस ठाण्यात आणून अटकेपासून वाचवण्याचा बराच प्रयत्न झाला. त्यामुळे तक्रार दाखल करण्यास तीन दिवसाचा विलंब झाला आणि सरपंच संदीप पाटोळे फरार होण्यास संधी मिळाली. एका मागासवर्गीय महिला ग्रामपंचायत सदस्याचा अवमान करून लज्जा उत्पन्न करणाऱ्या सरपंचाला गांधीनगर पोलीस ठाण्यात आणून अटकेपासून वाचवण्याचा प्रयत्न झाल्यामुळे गांधीनगर पोलीस अधिकारी गुन्हेगाराच्या पाठीशी राहत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.