बागायती वाचवा;शेतकऱ्यांचा आळेफाट्यात रास्ता रोको आंदोलन
आळेफाटा, ता. जुन्नर: रविवारी पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गासाठी सुरू असलेल्या बागायती जमिनीच्या संपादनाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश उफाळून आला. यादरम्यान, आळेफाटा चौकात शेकडो शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जोरदार रास्ता रोको आंदोलन केले आणि आपला तीव्र विरोध नोंदवला. आंदोलनामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यामुळे प्रशासनाचीही एकच धांदल उडाली.
बागायती जमिनीवर कुऱ्हाड चालवणं आम्हाला मान्य नाही:
शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की,'आम्हाला महामार्गाच्या विकासाला कुठलाही विरोध नाही. मात्र, आमच्या उपजाऊ, बागायती जमिनीवर कुऱ्हाड चालवणं आम्हाला मान्य नाही. अनेक वर्षांच्या मेहनतीने आणि गुंतवणुकीने फुलवलेल्या या जमिनी उद्ध्वस्त झाल्यास आमचं आर्थिक जीवन उध्वस्त होईल. त्यामुळे महामार्गाचा मार्ग जिरायत भागातून वळवावा',अशी ठाम भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे.
बागायती जमिनीचा बळी देऊन विकास नको:
'बागायती जमिनीचा बळी देऊन विकास नको','शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा विकास आम्हाला मान्य नाही', अशा घोषणा देत आंदोलकांनी आळेफाटा चौक दणाणून सोडलं. या आंदोलनामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले असून, काही ठिकाणी आपत्कालीन सेवांनाही विलंब झाला.
प्रशासन आणि पोलिसांकडून शेतकऱ्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न:
यादरम्यान, प्रशासन आणि पोलिसांकडून शेतकऱ्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, शेतकऱ्यांचा निर्धार आहे आणि तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. हा संघर्ष केवळ जमिनीचा नसून, शेतकऱ्यांच्या हक्कांचा लढा असल्याची भावना आता अधिक तीव्र होत चालली आहे.