पहलगाम दहशतवाद हल्ल्याप्रकरणी शिवसेना आक्रमक; पाकिस्तानी झेंडा जाळत केला निषेध
जळगाव: मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी, शिवसेना आक्रमक असून या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना (शिंदे गट) यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला. त्यासोबतच, त्यांनी अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवला. पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) आक्रमक असल्याचे पाहायला मिळाले. त्यासोबतच, 'इस्लामिक आतंकवाद मुर्दाबाद', 'पाकिस्तान मुर्दाबाद' अशा घोषणा देत टॉवर चौकात शिवसेना (शिंदे गट) यांनी निषेध नोंदवला.
मुख्यमंत्र्यांनी घेतला पुढाकार:
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना राज्यातून परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांना राज्यात परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्यासोबत फोनद्वारे संवाद साधला. जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नायडू यांना एक विशेष विमान सोडण्याची विनंती केली. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले की, 'ही विनंती मान्य होताच आणि तिथे अडकलेल्या पर्यटकांची यादी मिळाल्यास त्यांना विशेष विमानाने मुंबईत आणण्याची सोय करू'.
पहलगाम येथे मृत झालेल्या महाराष्ट्रातील मृतांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
1 - अतुल मोने (डोंबिवली) 2 - संजय लेले (डोंबिवली) 3 - हेमंत जोशी (डोंबिवली) 4 - संतोष जगदाळे (पुणे) 5 - कौस्तुभ गणबोटे (पुणे) 6 - दिलीप देसले (पनवेल)