'या' कारणांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला सिंधुदुर्ग किल्ला
छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील एक महान योद्धा आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकीर्दीत अनेक किल्ले जिंकले होते. राज्याच्या संरक्षणासाठी आणि स्वराज्य विस्तारासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक भक्कम किल्ले बांधले होते, जे आजही मजबूत आहे. त्यापैकीच एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. चला तर मग जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या कारणांसाठी बांधला.
1 - पोर्तुगीज आणि सिद्दी यांच्या धोक्याला रोखण्यासाठी:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोकण किनारपट्टीवर पोर्तुगीज आणि सिद्दी यांचा प्रचंड प्रभाव होता. एकीकडे गोवा आणि वास्को-ड-गामा परिसरात पोर्तुगीजांची सत्ता मजबूत होती आणि ते वारंवार मराठ्यांच्या सागरी हालचालींमध्ये अडथळा निर्माण करत होते. तर दुसरीकडे, जंजीरा येथे असलेल्या सिद्दीच्या नौदलाचा देखील मराठ्यांच्या सागरी क्षेत्रावर प्रभाव होता. या दोघांच्या आक्रमणांना रोखण्यासाठी आणि त्यासोबतच, सागरी सामर्थ्याला मजबूत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला
2 - स्वराज्याचे सागरी संरक्षण मजबूत करण्यासाठी:
छत्रपती शिवाजी महाराजांना सागरी संरक्षण आणि सागरी व्यापाराचे महत्त्व माहित होते. त्यांच्या काळात समुद्रमार्गाने व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना सुरक्षितता मिळावी आणि त्यासोबतच स्वराज्याच्या सागरी किनाऱ्याचे संरक्षण व्हावे यासाठी सिंधुदुर्ग किल्ला बांधला होता.
हेही वाचा: जेजुरी मंदिराच्या ड्रेस कोडचा मुद्दा तापणार! तृप्ती देसाईंची आक्रमक प्रतिक्रिया
3 - स्वराज्यासाठी एक मजबूत सागरी तळ उभारण्यासाठी:
मराठ्यांसाठी हा किल्ला एक सागरी तळ (Naval Base) म्हणून विकसित केला गेला. यामधून महाराजांनी मराठा आरमाराचे (Navy) भक्कम आधार केंद्र उभारले. यामुळे कोकण किनाऱ्यावरून होणाऱ्या शत्रूंच्या आक्रमणांना रोखणे शक्य झाले.
4 - वेंगुर्ले बंदर व सागरी व्यापारावर नियंत्रण:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, वेंगुर्ले हे एक महत्त्वाचे सागरी बंदर होते. या भागात व्यापारी जहाजांची मोठी वर्दळ होती. पण, पोर्तुगीज आणि सिद्दी, या व्यापारावर नियंत्रण ठेवत होते. त्यांना रोखण्यासाठी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला होता, ज्यामुळे मराठ्यांना सागरी मार्गांचा उपयोग अधिक प्रभावीपणे करता आला.
5 - किल्ल्यांच्या साखळीचा मुख्य भाग म्हणून उभारणी:
स्वराज्याच्या संरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ल्यांची एक साखळी निर्माण केली होती. जसे की रायगड, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, प्रतापगड, आणि सिंधुदुर्ग. सागरी संरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी केली होती.