सिंधुदुर्ग हादरले! सिगारेट लाईटरच्या वादातून चुलत भावाची निर्घृण हत्या
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरेरी-कुळये जवळील सादेवाडी येथील दगडखाणीजवळ मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. किरकोळ वादातून 20 वर्षीय स्थलांतरित कामगाराची त्याच्याच चुलत भावाने हत्या केली. मृताचे नाव कृष्णकुमार जुगराज यादव असे आहे, जो मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. तो खाणीत काम करत असे. त्याचा चुलत भाऊ आणि सहकारी रितिक दिनेश यादव याला पोलिसांनी या गुन्ह्यासाठी अटक केली आहे. खाणीचे पर्यवेक्षक विजय अन्नप्पा शेंडगे यांच्या सतर्कतेमुळे हा खून उघडकीस आला. शेंडगे यांनी त्यांच्या नियमित तपासणीदरम्यान दोघांची अनुपस्थिती लक्षात घेतली.
लाईटरवरून झाला वाद -
देवगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री रितिकने कृष्णकुमारकडे सिगारेट पेटवण्यासाठी लाईटर मागितला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला व कृष्णकुमारने रितिकला चापट मारली. संतापून रितिकने जवळच असलेल्या ट्रकमधून लोखंडी रॉड काढून कृष्णकुमारच्या डोक्यात घाव घातला. जागीच मृत्यू झाल्यानंतर, रितिकने रॉड खाणीतल्या पाण्याच्या टाकीत फेकून पुरावा लपवण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळावरून पळून काढला.
हेही वाचा - नागपूर कारागृहात कैद्याची आत्महत्या; अंतर्वस्त्राच्या इलास्टिकने घेतला गळफास
पर्यवेक्षकाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला गुन्हा -
दरम्यान, खाणीचे पर्यवेक्षक विजय अन्नप्पा शेंडगे यांना दोघेही कामावर अनुपस्थित आढळले. त्यांनी कामगारांच्या मदतीने परिसरात शोध सुरू केला असता, कृष्णकुमारचा रक्तबंबाळ मृतदेह खाणीच्या एका भागात आढळून आला. लगेचच यासंदर्भात पोलीस पाटील श्री. पारकर यांना माहिती देण्यात आली. तसेच देवगड पोलीस ठाण्याला कळवण्यात आले.
हेही वाचा - मंगळवेढ्यात दीर-भावजयीच्या अनैतिक संबंधांची थरारक कथा
पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. तथापी, आरोपीवर याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खाण भागातील कामगारांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी या भागातील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची गरज व्यक्त केली आहे.