SpiceJet Flight Emergency Landing: टेकऑफ दरम्यान स्पाइसजेटच्या विमानाचे चाक निसटले; मुंबई विमानतळावर करण्यात आले आपत्कालीन लँडिंग
SpiceJet Flight Emergency Landing: गुजरातमधील कांडला विमानतळावरून उड्डाण घेणाऱ्या स्पाइसजेटच्या Q400 विमानाला शुक्रवारी तांत्रिक अडचणीमुळे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. टेकऑफ दरम्यान विमानाचे बाह्य चाक धावपट्टीवर निसटले. मात्र विमानाने सुरक्षितपणे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग केले. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.
एअरलाइनच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, '12 सप्टेंबर रोजी कांडलाहून मुंबईकडे जाणारे स्पाइसजेटचे Q400 विमान उड्डाण घेतल्यानंतर त्याचे एक बाह्य चाक धावपट्टीवर निसटले. तरीही विमानाने मुंबईकडे आपला प्रवास सुरू ठेवला आणि नियोजितप्रमाणे सुरक्षित लँडिंग केले. विमानाचे लँडिंग झाल्यानंतर विमान स्वतःच्या शक्तीने टर्मिनलपर्यंत पोहोचले. त्यानंतर सर्व प्रवासी सुरक्षित उतरले.'
हेही वाचा - Mumbai: लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; 25 हजारांहून अधिक इमारतींना ओसी देणार
घटनेची माहिती मिळताच मुंबई विमानतळावर आपत्कालीन पथक सतर्क करण्यात आले होते. अग्निशमन दल, वैद्यकीय कर्मचारी आणि तांत्रिक तज्ञ विमानतळावर सज्ज होते, मात्र लँडिंग प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. प्रवाशांनी विमानातून सामान्यपणे उतरून सुटकेचा श्वास घेतला.
विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ञांच्या मते, अशा घटना अत्यंत दुर्मिळ असतात. तथापी, सुरक्षा प्रोटोकॉलनुसार पायलट व क्रूने योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे मोठा अपघात टळला. विमानाच्या तपासणीसाठी नागरी विमान वाहतूक महानिर्देशालयाकडून (DGCA) विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे. या घटनेनंतर स्पाइसजेटने प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पुन्हा स्पष्ट केले. विमानसेवेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत. तांत्रिक कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू आहे.