राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींना दिला खास पारंपरिक पैठणी स्टोल भेट
नवी दिल्ली: राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील कुशल विणकरांनी तयार केलेली पारंपरिक पैठणी स्टोल पंतप्रधानांना भेट म्हणून दिला. पंतप्रधानांनी ही हातमागाची भेट स्वीकारल्याबद्दल सुळे यांनी सोशल मीडियावरून कृतज्ञता व्यक्त केली. सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'माननीय पंतप्रधान @narendramodi जी, राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल आणि महाराष्ट्रातील प्रतिभावान विणकरांकडून विणलेल्या प्रतिष्ठित पैठणीच्या भेटीचा उदारतेने स्वीकार केल्याबद्दल धन्यवाद.'
हेही वाचा - 'राहुल गांधींच्या मेंदूची चिप चोरी झालीय'; देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींवर निशाणा
केळी फायबर तंत्रज्ञानावर चर्चा -
या भेटीदरम्यान, सुप्रिया सुळे यांनी केळी फायबरपासून बनवण्यात येणाऱ्या कापडाच्या उत्पादनातील अडचणी, तसेच विणकाम करणाऱ्या ग्रामीण कारागिरांच्या अडचणी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यांनी केंद्र सरकारने अशा कारागिरांसाठी धोरणात्मक पाठबळ देण्याची विनंती केली, जेणेकरून त्यांचा व्यवसाय आणि उत्पन्न दोन्ही वाढू शकेल.
हेही वाचा - मंचरमधील 24 नागरिक उत्तराखंडमध्ये अडकले; सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्री धामी यांना मदतीचे आवाहन
मोदींकडून शरद पवारांच्या प्रकृतीची चौकशी -
पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यावर सुळे यांनीही आभार मानले. सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी लोकसभेत ऑपरेशन सिंदूर विषयावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांना आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल मोदींची प्रशंसा केली होती. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सुळे यांच्याशी संपर्क साधून शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी भाजपचे अनुराग ठाकूर आणि काँग्रेसचे आनंद शर्मा यांच्यासह शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.