प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. क

औरंगजेबाच्या कबरीवरून तणाव वाढला, खुलताबादमध्ये कडक पोलिस बंदोबस्त!

छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे यांनी कबर नष्ट करण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून, 16 मार्च 2025 ते 5 एप्रिल 2025 या कालावधीत त्यांच्यावर जिल्हाबंदी लागू करण्यात आली आहे. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी खुलताबादमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनीही यापूर्वी कबर हटवण्याची मागणी केली होती. त्यांच्या विधानानंतर प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. कबर परिसरात SRF पथक तैनात असून, दोन अधिकारी आणि 15 कर्मचारी सतत गस्त घालत आहेत. तसेच, कबरीजवळ जाणाऱ्या मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे.

हेही वाचा: Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025: भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा भव्य सोहळा!

हिंदुत्ववादी संघटनांनी सरकारला कबर हटवण्याचा इशारा दिला असून, वेळेत कारवाई न झाल्यास कारसेवा करून कबर नष्ट करू असा इशारा दिला आहे.  यामुळे प्रशासन हायअलर्टवर असून, पर्यटकांची संख्या देखील कमी झाली आहे. पुरातत्व विभागाने देखील या परिस्थितीची दखल घेतली असून, औरंगजेबाच्या कबरीवर सुरक्षा वाढवण्यासाठी आच्छादन बसवण्याचे काम सुरू केले आहे. कबरीवर कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये यासाठी खबरदारी घेतली आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

या पार्श्वभूमीवर खुलताबाद परिसराला छावणीचे स्वरूप आले असून, पोलिस आणि वरिष्ठ अधिकारी सतत परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.कारवाईसाठी पोलिस सज्ज आहेत, तर औरंगजेबाच्या कबरीभोवती सुरक्षाव्यवस्था अधिक बळकट करण्यात आली आहे.