लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! 'या' खास दिवशी जमा होणार 10व्या हप्त्याचे पैसे
मुंबई: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या दहाव्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, आता सरकारने दहाव्या हप्त्याची तारीख स्पष्ट केली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता आता 30 एप्रिल 2025 रोजी म्हणजेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी महिलांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे. यापूर्वी 8 मार्च 2025 रोजी महिला दिनी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन हप्ते एकत्र करून 3 हजार रुपये एकत्रितपणे हस्तांतरित करण्यात आले होते.
लाभार्थी महिलांना आतापर्यंत 9 हप्ते देण्यात आले -
दरम्यान, सरकारने राज्यातील लाभार्थी महिलांना आतापर्यंत 9 हप्ते दिले आहेत. जुलै 2024 ते मार्च 2025 दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला एकूण 13,500 रुपयांची मदत देण्यात आली आहे. राज्यातील सुमारे 2 कोटी 53 लाख महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. आतापर्यंत सरकारने या योजनेसाठी एकूण 33,232 कोटी रुपये खर्च केले आहेत.
हेही वाचा - मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 8 पदरी होणार; 'मिसिंग लिंक' प्रकल्प अंतिम टप्प्यात
पात्र महिलांची तपासणी प्रक्रिया सुरू -
तथापी, 2025-26 च्या अर्थसंकल्पातही सरकारने या योजनेसाठी 36000 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत, प्रत्येक पात्र महिलेला दरमहा 1500 ची आर्थिक मदत दिली जाते. तथापि, दरम्यानच्या काळात सरकारने पात्र महिलांची तपासणी करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. यामध्ये, ज्या महिला योजनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करत नाहीत, जसे की 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असणे किंवा स्वेच्छेने लाभ घेऊ इच्छित नाही अशा महिलांना वगळण्यात येत आहे.
हेही वाचा - नमो शेतकरी महासन्मान निधीबाबत महत्त्वाची बातमी! 'शेतकरी ओळपत्र' नसल्यास मिळणार नाहीत पैसे
11 लाख महिलांचे अर्ज नाकारले -
दरम्यान, सरकारने आतापर्यंत पात्र नसलेल्या सुमारे 11 लाख महिलांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत. त्यामुळे, दहावा हप्ता देताना आता लाभार्थ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. सरकार ही योजना पारदर्शक आणि पात्र महिलांपुरती मर्यादित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पडताळणीनंतरच अंतिम यादी तयार केली जाईल आणि त्या आधारावर पैसे हस्तांतरित केले जातील.