पुण्यात स्वारगेट बस डेपोमध्ये तरुणीवर झालेल्या बला

Beed Crime News: जागतिक महिला दिनीच विकृतीचा कळस! रक्षकानेच केला विश्वासघात

Beed Crime News: पुण्यात स्वारगेट बस डेपोमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली होती. मात्र, त्याच संतापावर पाणी फेरत, बीडमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, जागतिक महिला दिनीच एका पोलीस कर्मचाऱ्याने तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटोदा पोलीस ठाण्यातील अमलदार उद्धव गडकर यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी एका महिलेला बोलावले. मात्र, हा सन्मानाचा कार्यक्रम महिलेसाठी दुर्दैवी ठरला. स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात नेत, त्या अमलदाराने तिच्यावर अमानुष अत्याचार केला.ही महिला पुण्यावरून बीडला येत होती. बसमधून उतरल्यानंतर, संधी साधत आरोपीने तिला गाठले आणि आपल्या जाळ्यात ओढले.

पीडित महिलेचे काही कामानिमित्त पाटोदा पोलीस ठाण्यात जाणे झाले होते. त्याच दरम्यान, तिची आणि आरोपी अमलदार गडकर यांची ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्याशी संपर्क वाढवला आणि तिला पाटोदा येथे बोलावून घेतले. स्टेट बँकेच्या बाजूला असलेल्या घरात नेत, तिच्यावर बलात्कार केला. महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र, चोरीचा बनावट गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आरोपीने अत्याचार सुरूच ठेवला.

ही घटना दुपारी 1वाजताच्या सुमारास घडल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले. तिने तत्काळ पाटोदा पोलीस ठाण्यात पोहोचून पोलीस निरीक्षकांसमोर आपली तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आणि तत्काळ आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

महिला दिनीच महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना धक्कादायक आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.