पेशंटचा रक्तस्राव सुरुच होता, तनिषा भिसेंच मानसिक खच्चीकरण झालं; रुपाली चाकणकरांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचाराच्या विलंबामुळे गर्भवती महिला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळे एका आयुष्याचा अंत झाल्याचा आरोप करत तनिषाच्या कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लेखी निवेदनही दिलं असून संपूर्ण प्रकरणाची माहिती चाकणकरांनी पत्रकार परिषदेत मांडली.
साडेपाच तास रुग्णालयात – पण उपचार नाहीत
चाकणकरांच्या माहितीनुसार, 28 मार्च रोजी सकाळी 9 वाजून 1 मिनिटांनी तनिषा भिसे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांशी संपर्क झाल्यानंतर सर्जरीसाठी तयारी सुरू झाली. मात्र, ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्याआधीच रुग्णालय प्रशासनाने 10 लाख रुपयांची मागणी केली. कुटुंबीयांकडे त्यावेळी फक्त 3 लाख रुपये होते, हे स्पष्ट केल्यानंतरही रुग्णालयाने उपचार सुरू केले नाहीत. साडेपाच तास तनिषा रुग्णालयात असताना त्यांना कोणतेही प्राथमिक उपचार देण्यात आले नाहीत. याऐवजी त्यांच्या जवळ असलेल्या गोळ्या घेण्याचा सल्ला दिला गेला. रुग्णाच्या नातेवाईकांचा दावा आहे की, मंगेशकर रुग्णालयाने आमच्यावर उपचार करायला तयार असल्याचं सांगितलं. शस्त्रक्रिया करण्याची सर्व तयारी झालेली असताना मात्र, पैसे वेळेत भरु न शकल्याने उपचार केले नाहीत. या काळात तनिषाचा रक्तस्राव सतत सुरू होता, परिणामी तिची मानसिक स्थिती खचली होती.रुग्णालयाने स्वतःवरील आरोप टाळण्यासाठी तनिषा भिसे यांच्या आरोग्यविषयक वैयक्तिक माहितीचा अहवाल प्रसारमाध्यमांमध्ये दिला, यावर चाकणकरांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी स्पष्ट केलं की, रुग्णांची गोपनीय माहिती बाहेर दिली जाणं ही गंभीर बाब आहे आणि याबाबत रुग्णालयाला समज देण्यात येणार आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासह सूर्या आणि ससून रुग्णालयांचाही अहवाल राज्य शासनासमोर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार तनिषाला वेळेवर उपचार मिळाले नाहीत, असा निष्कर्ष स्पष्टपणे समोर आला आहे. याव्यतिरिक्त ‘मातामृत्यू अन्वेषण’ विभाग आणि धर्मादाय विभाग यांचे स्वतंत्र अहवाल आज आणि उद्या अनुक्रमे सादर होणार आहेत.
महत्वाचे मुद्दे - चाकणकरांची मांडणी • दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचार देण्याऐवजी 10 लाख रुपयांची तातडीची मागणी केली. • रुग्णालयात असतानाही प्राथमिक उपचार न केल्यामुळे रुग्णाची तब्येत अधिक खालावली. • तनिषाच्या मृत्यूमागे रुग्णालयाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. • रुग्णाच्या नातेवाईकांना रक्तस्राव थांबवण्यासाठी स्वतःकडील औषध द्यायला सांगितलं. • शासन आणि महिला आयोग यांच्याकडून दोषींवर कायदेशीर कारवाईची हमी. • तिन्ही समित्यांचे संयुक्त अहवाल आल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार. • आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनाही या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.