कृषीमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी; कोकाटेंनी ओढवून घेतला नवा रोष
मुंबई : शेतीला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्यास आशाळभूतपणे राज्यातील बळीराजा हा कृषीमंत्र्यांकडं आस लावून असतो, मात्र जर का हेच महोदय, अशा प्रकारे बेजबाबदार वक्तव्य करत असतील, तर साहजिकच शेतकऱ्यांच्या टीकेचे ते लक्ष्य बनणारंच. अगोदरच राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून शेतकरी आता मदतीच्या आशेने सरकारकडे पाहत आहे. त्यातच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतंच एक वादग्रस्त विधान केलं होतं. सिन्नर तालुका दौऱ्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना शेतकऱ्यांच्या भावना दुखावणरं वक्तव्य केलं होतं, "ढेकळांचे पंचनामे करायचे का?" माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. आता माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वाद निर्माण करणारं वक्तव्य करून नवा रोष ओढवून घेतला आहे.
कृषीमंत्रिपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकीच आहे आणि मला हे खातं दिलंय, असं विधान दस्तुरखुद्द कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं आहे. यानंतर मंत्र्यांनी "मी असं काही बोललोच नाही "असं म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र म्हणतात ना बूंद से गई वों हौद सें नही आती, असं काहीसं माणिकरावांचं झालं आहे.
कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अपशब्द कोणत्याही मंत्र्यांनी वापरु नये असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. कोकाटेंच्या वक्तव्यावर अजित पवार विचार करतील असेही बावनकुळेंनी सांगितले आहे. याबाबतचा निर्णय अजित पवार साहेबच करू शकतात. समाजाला वाईट वाटेल असे कुठले ही अपशब्द किंवा वाक्प्रचार कोणत्याही मंत्र्यांनी करू नये, जेणेकरून समाजमन दुखेल, जेणेकरून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले जाईल किंवा समाजाला वाईट वाटेल असं वर्तन मंत्र्यांकडून अपेक्षित नाही अशा सूचना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.