त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी ऑनलाइन पास विकणाऱ्यांचा पर्दाफाश
किरण गोटूर, प्रतिनिधी, नाशिक: दरवर्षी श्रावणात लाखो भाविक दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरात येत असतात. पण गर्दी इतकी असते की दर्शनासाठी भाविकांना तासनतास रांगेत राहावं लागतं. त्यामुळे भक्तांकडून पासेसचा पर्याय बघितला जातो. भक्तांची हीच गरज ओळखून खोट्या पासेसचा गोरखधंदा काहींनी थाटला आणि भक्तांची लुट सुरु केली. मंदिर समितीच्या वेबसाईटवर दररोज 2000 पास वितरीत केले जातात. यापैकी ऑनलाइन मिळणारे 100 ते 200 पास हे आरोपी टोळीच्या सदस्यांकडून घेतले जात आणि नंतर गरजू भाविकांना अव्वाच्या सव्वा दराने विकले जात होते. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
बारा ज्योतिर्लिंग पैकी एक अत्यंत महत्वाचे असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आवश्यक असलेले ऑनलाइन पास चक्क 200 रुपयांच्या जागी 1000 रुपयांना विकण्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून, त्र्यंबकेश्वर पोलिसांनी या प्रकरणात गावातील पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे.
मंदिर संस्थानच्या वेबसाईटमधील तांत्रिक त्रुटींचा फायदा घेत हा काळाबाजार सुरु होता. मंदिराच्या ऑनलाईन प्रणालीचा गैरफायदा घेऊन तयार केलेले पास मोबाईल आणि बनावट आयडीच्या साहाय्याने भाविकांना दिले जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्व आरोपी त्र्यंबकेश्वर परिसरातलेच आहेत. घडलेल्या प्रकारानंतर मंदिर संस्थानने त्वरित वेबसाईटमधील तांत्रिक त्रुटी दूर करण्याचं आश्वासन दिलंय.
त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तातडीने कारवाई करत टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पण गेल्या 6 महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. त्यामुळे पोलिसांच्या कारवाई नंतर तरी भक्तांची लूट थांबणार हे बघावं लागेल.