वर्ध्यातून हिंदुत्वाचा हुंकार; पश्चिम बंगालच्या अन्यायाविरुद्ध जन आक्रोश मोर्चा
वर्धा : पश्चिम बंगालमध्ये हिंदू समाजावर सुरू असलेल्या कथित अत्याचाराच्या निषेधार्थ वर्ध्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा आणि पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
या मोर्चाचे नेतृत्व भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, माजी खासदार रामदास तडस, आणि हिंदूत्ववादी विचारवंत अटल पांडे यांनी केले. हिंदू समाजावरील कथित अन्याय, हत्याकांड, धार्मिक भावना दुखावणाऱ्या घटना आणि प्रशासनाची भूमिका या सर्वांविरोधात संतप्त भावना व्यक्त करत हा मोर्चा वर्धा शहरातील मुख्य रस्त्यांवरून शांततेत काढण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाप्त झाला, जिथे एक निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले.
निवेदनात पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवरील हल्ले, धार्मिक दंगली आणि घरांवर झालेल्या आक्रमणांचं वर्णन करण्यात आलं असून, तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करून घटनात्मक मार्गाने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या देशात सर्व धर्मांना समान अधिकार आहेत, मात्र एका विशिष्ट राज्यात हिंदूंवर सतत अत्याचार होत असतील, तर हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे," असे मत भाजप नेत्यांनी यावेळी मांडले.
माजी खासदार रामदास तडस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर जे हल्ले होत आहेत ते अतिशय निंदनीय आहेत. तिथल्या प्रशासनाकडून काहीच पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. हा विषय केवळ एका राज्याचा नाही, तर संपूर्ण देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे.
तडस पुढे म्हणाले, वर्ध्यातून आम्ही एकजुटीचा संदेश देत आहोत. सकल हिंदू समाज शांततेत आणि संविधानाच्या चौकटीत राहून आपली नाराजी व्यक्त करत आहे. परंतु जर असेच प्रकार सुरू राहिले, तर लोकशाही व्यवस्थेवरचा विश्वास डगमगेल.
मोर्चादरम्यान ‘जय श्रीराम’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी वर्ध्याचे वातावरण भारले होते. नागरिकांनी हातात फलक, झेंडे आणि बॅनर्स घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. महिलांचा देखील मोर्चात लक्षणीय सहभाग होता.
हा मोर्चा केवळ पश्चिम बंगालमधील घटनांवर रोष व्यक्त करणारा नसून, तो हिंदू समाजाच्या आत्मसन्मानाचा आणि सुरक्षिततेच्या भावनेचा आवाज असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. निवेदनाद्वारे त्यांनी केंद्र सरकारकडे विशेष चौकशी, पीडितांना न्याय आणि कडक कारवाईची मागणी केली आहे.
या जन आक्रोश मोर्चानंतर आता महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारच्या आंदोलनांची शक्यता वर्तवली जात आहे. हिंदू समाज संघटनांनी याबाबत एकत्र येऊन मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही दिला आहे.