नागपुरात सुशिक्षित तरुणींमध्ये स्कूटर चोरण्याचा ट्रेंड; नेमकं प्रकरण काय?
तेजस मोहातुरे. प्रतिनिधी. नागपूर: शहरात अनेकदा तुम्ही गाड्या चोरीला गेल्याच्या घटना ऐकल्याच असाल. यात बऱ्याचदा तरुण मुलांची नावे समोर येतात. मात्र, नागपुरात एक वेगळाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. मुलांच्या पाठोपाठ आता मुलीही गाडी चोरी करण्याच्या प्रकरणात सहभागी होत असल्याचे चित्र समोर आले आहे. ही घटना श्रीकृष्ण नगर येथील एका शॉपिंग मॉलमध्ये घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकं प्रकरण काय?
शनिवारी दुपारी वीणा राजगिरे (वय: 43) ही गृहिणी तिच्या स्कूटरवरून श्रीकृष्ण नगर येथील मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी गेली होती. नेहमीप्रमाणे तिने पार्किंगमध्ये स्कूटर पार्क केली आणि मॉलमध्ये खरेदीसाठी गेली. मात्र, काही वेळाने जेव्हा त्या परत मॉलमधून बाहेर आल्या, तेव्हा त्यांनी पहिले की आपली स्कूटर पार्किंगमधून गायब आहे. सुरुवातीला त्यांना असे वाटले की, त्यांनी स्कूटर चुकीच्या ठिकाणी लावली असावी. त्यामुळे, त्यांनी सर्वत्र आपल्या स्कूटरला शोधण्यास सुरुवात केली. मात्र, सर्वत्र शोधूनही त्यांना स्कूटर मिळाली नाही.
जेव्हा त्यांनी मॉलच्या व्यवस्थापनाकडून सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली, तेव्हा एक धक्कादायक बाब त्यांच्या निदर्शनास आले. फुटेजनुसार, तीन तरुणी एका दुसऱ्या स्कूटरवरून ट्रिपल सीट येतात आणि वीणा राजगिरे यांच्या स्कूटरजवळ येऊन थांबतात. यानंतर, काही वेळातच या तरुणी स्कूटरची लॉक तोडतात आणि स्कूटर घेऊन फरार होतात. या घटनेदरम्यान, तिघींच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती किंवा गडबड दिसली नाही.
या घटनेमुळे वीणा राजगिरे यांना मोठा धक्का बसला आहे. चोरीसारख्या गुन्ह्यात आता मुलीही सहभागी होत आहेत, हे बाब खूपच धक्कादायक आणि चिंताजनक आहे. याबाबत, वीणा राजगिरे यांनी फिर्याद नोंदवली असून याप्रकरणात पोलीस त्या मुलींचा शोध घेत आहेत. 'चक्क मुली देखील बाईक चोरी करू लागल्या आहेत. हे खूप खतरनाक आणि वाईट आहे', असे त्यांचे म्हणणे आहे.