धक्कादायक माहिती उघड: मृत्यूपूर्वीही सुरू होती मारहाण; वैष्णवीच्या शरीरावर 29 खुणा, 6 ताज्या जखमांनी छळाचा धक्कादायक खुलासा
पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आता पोस्टमॉर्टम अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवीच्या अंगावर एक-दोन नव्हे, तर तब्बल 29 मारहाणीच्या खुणा आढळून आल्या असून त्यातील 5 ते 6 व्रण हे ताजे असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे वैष्णवीचा छळ केवळ पूर्वीचाच नसून, तिच्या मृत्यूपूर्वीच्या काही तासांपर्यंतही सुरु होता, हे धक्कादायक वास्तव उघड झालं आहे.
24 वर्षीय वैष्णवी हगवणे हिचा विवाह 2023 मध्ये शशांक हगवणे याच्याशी झाला होता. प्रेमविवाहाच्या नावाखाली झालेल्या या लग्नात मुलीच्या वडिलांनी तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च केला होता. 51 तोळे सोनं, चांदीची भांडी, आलिशान कार आणि भव्य रिसॉर्टमध्ये शाही लग्न असा बडेजाव करण्यात आला होता. मात्र, त्या झगमगाटाआड सुरू झाला होता एक क्रूर मानसिक आणि शारीरिक छळाचा प्रवास.
शवविच्छेदन अहवालानुसार, वैष्णवीच्या शरीरावर 29 ठिकाणी झालेल्या मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे आढळून आल्या आहेत. या खुणांपैकी काही जुने असले तरी 5 ते 6 व्रण ताजे असून, ती आत्महत्या करण्याच्या दिवशीच मारहाणीची शिकार झाली होती, हे आता स्पष्ट झाले आहे. पोलिसांनीही न्यायालयात याचा उल्लेख करत वैष्णवीवर सासरच्या मंडळींकडून सातत्याने छळ केला जात होता, हे मान्य केलं आहे.
या प्रकरणात पोलिसांनी तिचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक केली आहे. न्यायालयीन कोठडीच्या मागणीदरम्यान पोलिसांनी हाच शवविच्छेदन अहवाल सादर करत या प्रकरणाचं गांभीर्य अधोरेखित केलं.
हा प्रकार केवळ कौटुंबिक वाद किंवा वैयक्तिक दु:ख म्हणून पाहता येणार नाही. लग्नात शाही थाटामाट, दीड कोटींचा खर्च, आणि त्यानंतर सुरू झालेला अत्याचार हे सगळं समाजातल्या स्त्रियांच्या सुरक्षिततेवर आणि हुंड्याच्या नावाने चालणाऱ्या छुप्या हिंसेवर मोठा प्रश्नचिन्ह उभं करतं.