Who Is Karishma Hagawane: वैष्णवी हगवणेचा छळ करणारी नणंद करिष्मा हगवणे कोण? जाणून घ्या
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पिंपरी येथील मुळशी शाखेचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून, म्हणजेच वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी जगताप यांनी हगवणे कुटुंबीयांबद्दल खळबळजनक माहिती दिली आहे. तसेच, या प्रकरणावर मयुरीने नणंद करिष्मा हगवणेवर धक्कादायक आरोप केले आहेत. मयुरीने दिलेल्या माहितीनुसार, घरातील प्रत्येक निर्णय करिष्मा हगवणे उर्फ पिंकी ताई घेत असे. अशातच, चौकशीच्या केंद्रस्थानी असलेली करिष्मा हगवणे सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, अनेकांना हा प्रश्न पडला असेल आणि ते म्हणजे राजेंद्र आणि लता हगवणे यांची कन्या करिष्मा हगवणे उर्फ पिंकी ताई आहे तरी कोण? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा: 'आम्ही दिघे साहेबांना तुमच्यात बघतो'; वैष्णवीच्या कुटुंबीयांची शिंदेंकडे कारवाईची मागणी
कोण आहे वैष्णवी हगवणे?
करिष्मा हगवणे उर्फ पिंकी ताई ही वैष्णवीची नणंद आहे. करिष्मा ही हगवणे कुटुंबातील ज्येष्ठ आणि अविवाहित असून तिचे वय 34 आहे. करिष्मा तिच्या पालकांसोबत मुळशी तालुक्यात राहत असे. तिच्या दबदब्याचा प्रभाव इतका होता की, घरात कोण कोणाशी बोलेल, कोण कशी वागेल, हेही करिष्माच ठरवत असे. करिष्मावर असा आरोप आहे की तिने वैष्णवीचा आणि मयुरीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. करिष्माच्या इंस्टाग्राम अकाउंटनुसार, ती एक फॅशन डिझायनर आहे. करिष्माचा 'लक्ष्मीतारा' नावाचा एक ब्रँड आहे. तसेच करिष्माने राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) खासदार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासोबतचे फोटो देखील पोस्ट केले आहेत. अशातच, करिष्मा हगवणेचे आणखी काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये त्यांचे मोठ्या राजकीय नेत्यांसोबत संबंध असल्याचे दिसून येते.
अंजली दमानियांचा करिष्मा हगवणेंना सवाल:
22 मे रोजी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी करिष्मा हगवणेंवर सवाल केला आहे की, 'करिष्मा हगवणे बरोबर सुनेत्रा पवार? ह्याच करिष्मा हगवणे बरोबर सुप्रिया सुळे आणि शरद पवार पण आहेत? हे पण वरवरचे संबंध आहेत का? आज अजित पवार म्हणतात एका लग्नात गेलो आणि माझ्या मागे लचांड लागलं? इतक्या गंभीर विषयावर अशी भाषा? संवेदनशील असू शकत नाहीत हे? धक्कादायक'.