फोंडाघाटात वाहनाला भीषण आग, वाहतूक ठप्प
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट परिसरात आज सकाळी डिझेल टँकरला भीषण आग लागल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. काही वेळांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे वाहनाची अवस्था एवढी खराब झाली आहे की ओळखणे अशक्य झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, डिझेल टँकरमध्ये स्फोट झाल्यामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
घटना कणकवलीपासून काही अंतरावर फोंडाघाट परिसरात घडली. या मार्गावरून पश्चिम महाराष्ट्राला होणारी संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. सध्या अग्निशमन दलाचे पथक आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
या भीषण आगीत टँकरचे मोठे नुकसान झाले असून स्फोटामुळे परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. सुदैवाने, अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
फोंडाघाट मार्ग हा पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा दळणवळण मार्ग असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना तात्पुरता पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.या घटनेमुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून आग कशी लागली याचा तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून घटनेतील नुकसान आणि जीवितहानीबाबत अधिकृत माहिती लवकरच उपलब्ध होईल, असे सांगितले आहे.