राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकार

Ajit pawar on Viral Call: आयपीएस अंजना कृष्णासोबतचा व्हिडीओ कॉल व्हायरल, अजित पवारांचं स्पष्टीकरण

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील संवादाचा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमांमध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार हे अंजना कृष्णा यांना खडसावत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी अजित पवार यांना चांगलेच धारेवर धरले आहे. आता या व्हिडिओवर खुद्द अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

अजित पवार यांनी एक पोस्ट शेअर करत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, "सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे." 

हेही वाचा: Anjali Damania On Amol Mitkari : 'हा काय फालतूपणा...' अमोल मिटकरी यांच्या पत्रावर अंजली दमानिया यांचा संताप

दरम्यान दुसरीकडे या प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. रोहित पवार म्हणाले, "राज्यात शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसाने झालेलं नुकसान असे अनेक प्रश्न आहेत पण त्यावर चर्चा होण्याऐवजी सध्या करमाळा येथील महिला पोलिस अधिकारी आणि मा. अजितदादा यांच्यातील संभाषणाचीच अधिक चर्चा होताना दिसते. वास्तविक अजितदादा सहज बोलले तरी ते रागावले, संतापले असं त्यांना भेटणाऱ्या नवख्या माणसाला वाटतं. पण अजितदादांची कार्यपद्धती, स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा गेली ३५-४० वर्षे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. करमाळा प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्याचीही कोणतीही चूक नाही. पण अजितदादांच्या फोन कॉलमधील संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन मित्रपक्षांकडूनच टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतं. आम्ही विरोधात असलो तरी माझा स्वभाव हा कायम खऱ्याला खरं म्हणण्याचा आहे, त्यामुळं आपल्याच मित्रांकडून कसा सापळा रचला जातो, हेही अजितदादांनी यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवं. आम्ही मात्र नको त्या वादात तेल न घालता खऱ्या प्रश्नांकडं सरकारचं लक्ष वेधत राहू."