पहलगाम हल्ल्यातील मृतांना शहीद दर्जा द्या; विनायक राऊत यांची मागणी
मुंबई: काश्मीरमधील पहलगाम येथे अलीकडेच झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना शहीदाचा दर्जा देण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. तसेच, मृतांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशीही ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.
या हल्ल्यात देशभरातून आलेल्या 25 हून अधिक पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, डोंबिवलीतील तीन नागरिकांचाही यात समावेश आहे. दिवंगत हेमंत जोशी यांच्या कुटुंबीयांची आज राऊतांनी भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मृतांना शहीदाचा दर्जा देण्याची आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक तसेच शासकीय मदत करण्याची गरज अधोरेखित केली.
हेही वाचा:भारतीय नौदल लढाईसाठी सज्ज; अरबी समुद्रातून डागली जहाजविरोधी क्षेपणास्त्रे
काश्मीरमधील अशा संवेदनशील भागांमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना असायला हव्या होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक असूनही सुरक्षा व्यवस्थेचा अभाव दिसून आला, ही बाब गंभीर आहे, असे सांगून राऊतांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. फक्त 370 कलम हटवल्याचा गजर करण्यात येतोय, पण प्रत्यक्षात काश्मीरमध्ये आजही दहशतवाद्यांचे वर्चस्व टिकून आहे. केंद्र सरकारला ते रोखण्यात अपयश आले आहे, अशी सडकून टीका त्यांनी केली.
राऊत यांच्या सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारीही या भेटीदरम्यान उपस्थित होते. त्यात माजी खासदार राजन विचारे, उपनेते विजय साळवी, कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे, जिल्हा संघटक तात्या माने, वैशाली दरेकर, शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे, अभिजीत सावंत, राहुल म्हात्रे आणि विलास म्हात्रे यांचा समावेश होता. सर्वांनी मिळून जोशी कुटुंबीयांना धीर देत या दुःखद प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले.
या हल्ल्याने संपूर्ण देशभर हळहळ व्यक्त केली जात असून, देशातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना करणे ही काळाची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.