वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट; कारागृह अधिक्षक बक्सार मुलानींची बदली
आमिर हुसैन. प्रतिनिधी. बीड: बीड जिल्हा कारागृहात सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप आहे. यादरम्यान, वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्यामुळे कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची बदली करण्यात आली आहे. आता कारागृह अधीक्षक पदावर रत्नागिरीहून रामराजे चांदणे रुजू होणार आहेत. संतोष देशमुख कुटुंबातील सदस्यांनी वाल्मीक कराडसह इतर आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी चर्चेत होते. अशातच त्यांची बदली करण्यात आली आहे.
कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी हे गेल्या तीन वर्षांपासून बीडमध्ये कार्यरत होते. त्यांचा 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही बदली करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, कारागृह प्रशासनावर झालेले आरोप आणि त्यानंतर झालेली बदली यावर आता चर्चा सुरू झाली आहे.