Water Supply: कल्याण एमआयडीसीसह अनेक भागात पाणीबाणी, या तारखेला बारवी धरणातील पाणी 24 तासांसाठी बंद
कल्याण: कल्याण-डोंबिवलीसह अनेक ठिकाणच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) होणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 18 ते 19 सप्टेंबर (गुरुवार आणि शुक्रवार) रोजी बारवी जलवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, अंबरनाथ औद्योगिक क्षेत्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याशिवाय अंबरनाथ, बदलापूर ग्रामीण भागातील गावांना होणारा पाणीपुरवठा गुरुवारी रात्री 12 ते शुक्रवारी रात्री 12 या कालावधीत बंद राहील.
एमआयडीसीच्या सिव्हिव इंजिनिअरनी याबाबत माहिती आहे. या माहितीनुसार, बारवी धरणातून येणारं पाणी अंबरनाथ तालुक्यातील जांभूळ गावाजवळील एमआयडीसी घेते. तिथे असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया करुन बदलापूर, अंबरनाथ निवासी, औद्योगिक क्षेत्र, कल्याण, डोंबिवली पालिका, नवी मुंबई, तळोजा औद्योगिक क्षेत्र, ठाणे, कळवा व मुंब्रा परिसराला वितरित केलं जातं. जलवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे हा पाणीपुरवठा काही काळासाठी बंद करण्यात येणार आहे.
एमआयडीसीने संबंधित ग्रामपंचायती, नगरपालिका, गृहनिर्माण सोसायट्या आणि नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन केले आहे. 18 ते 19 सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि त्याचा काळजीपूर्वक वापर करावा, असं आवाहन प्रशासनाने देखील केलं आहे.