निवदेन दिलं त्यात माझं काय चुकलं; विजय घाडगे घेणार अजित पवारांची भेट
पुणे: छावा संघटनेचे अध्यक्ष विजय घाडगे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार आहेत. पुण्यात अकरा वाजता विजय घाडगे अजित पवारांना भेटण्यासाठी जाणार आहेत. लातूरमधील पत्रकार परिषदेत राडा झाल्यानंतर चव्हाणांकडून घाडगे यांना बेदम मारहाण झाली होती. या मारहाणीनंतर छावा संघटनेच्या घाडगेंना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर घाडगे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी आग्रही असल्याचे पाहायला मिळाले. लातूरमध्ये उपचार सुरु असताना देखील गुरुवारी ते अजित पवारांना भेटण्यासाठी मुंबईला रवाना झाले. मात्र शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात असणार आहेत अशी माहिती मिळाल्याने घाडगेंनी गुरुवारी पुण्यात मुक्काम केला. सध्या त्यांच्यावर पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचार सुरु असून आज अकरा वाजता ते अजित पवारांना भेटणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
घाडगे घेणार अजित पवारांची भेट मी निवदेन दिले त्यात माझं काय चुकलं असा प्रश्न अजित पवारांना विचारणार असल्याची माहिती घाडगेंनी दिली. तसेच लोकशाहीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणे चूक आहे का? मी निवदेन देण्यासाठी गेल्यावर मारहाण करण्यात आली. त्यात माझा किंवा माझ्या कार्यकर्त्याचा जीव गेला असता असे विजय घाडगेंनी म्हटले आहे. दरम्यान विजय घाडगे आणि अजित पवार यांच्यात काय चर्चा होतो आणि काय तोडगा निघणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा: Gondia Crime: शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या लातूरमधील पत्रकार परिषदेत राडा झाला. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर राज्यात त्यांच्याविरुद्ध संताप व्यक्त केला गेला. याच संदर्भातील निवदेन देण्यासाठी छावा संघटनेचे कार्यकर्ते लातूरमधील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत गेले. यावेळी त्यांच्याकडून पत्ते फेकून कृषीमंत्री कोकाटेंचा निषेध करण्यात आला. यानंतर पत्रकार परिषदेत राडा झाला. राष्ट्रवादीचे माजी प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या मारहाणीत विजय घाडगे गंभीर जखमी झाले. त्यामुळेच आज घाडगे अजित पवार यांना भेटणार आहेत.