Abu Azmi Aurangzeb Controversy: अबू आझमी यांना अटक होणार का? देवेंद्र फडणवीस यांचा सपा आमदाराविरोधात आक्रमक पवित्रा
Abu Azmi Aurangzeb Controversy: मुघल शासक औरंगजेबाचे कौतुक करणारे सपा आमदार अबू आझमी यांच्या अडचणी वाढत आहेत. आझमी यांना संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत निवेदन देताना सांगितले की, त्यांना 100 टक्के अटक केली जाईल. दरम्यान, जेडीयूचे एमएलसी खालिद अन्वर यांनीही औरंगजेबबाबत मोठे विधान केले आहे. अन्वर यांनी म्हटलं आहे की, 'औरंगजेब एक चांगला राजा होता, त्याने मंदिरे नष्ट केली नाहीत. लोकांचे वेगवेगळे मत असते. इतिहासकार म्हणतात की औरंगजेब एक चांगला शासक होता, तो त्याच्या वर्णनाइतका क्रूर नव्हता.'
हेही वाचा - ''अबू आझमीला उत्तर प्रदेशात पाठवा'' योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य
मुख्यमंत्री योगींनी उपस्थित केले प्रश्न -
तथापि, उत्तर प्रदेशच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, भारताच्या श्रद्धेला पायदळी तुडवणाऱ्या व्यक्तीचे गौरव करणाऱ्या सदस्याला समाजवादी पार्टीमधून काढून टाकले पाहिजे. त्यांना इथे बोलवा, उत्तर प्रदेश अशा लोकांवर उपचार करण्यास उशीर करत नाही, असंही योदी यांनी यावेळी म्हटलं.
माझे निलंबन ही सरकारची मनमानी कृती - अबू आझमी
दरम्यान, आज अबू आझमी यांनी त्यांच्या निलंबनावर प्रतिक्रिया देत आपल्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करत म्हटलं आहे की, 'माझे निलंबन ही सरकारची मनमानी कृती आहे; माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. महाराष्ट्रात दोन कायदे चालू आहेत. जर महाराष्ट्रात लोकशाही संपली असेल तर सरकार जनतेसोबत आणि लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींसोबत काहीही करू शकते.'
नेमक काय म्हणाले अबू आझमी ?
3 मार्च रोजी आमदार अबू आझमी म्हणाले की, 'आपल्याला चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरे बांधली, मी त्याला क्रूर शासक मानत नाही. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई धार्मिक नव्हती तर सत्ता आणि मालमत्तेसाठी होती.' तथापि, वाद वाढल्यानंतर त्यांनी 4 मार्च रोजी आपले विधान मागे घेतले. स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, 'माझे विधान विकृत करण्यात आले आहेत. तरीसुद्धा, जर माझ्या शब्दांमुळे कोणाचे मन दुखावले असेल तर मी माझे शब्द परत घेतो.'