डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वाढत्या प्रभावामुळे सरकारन

यूट्यूब, इंस्टाग्रामवरून पैसे कमावताय? मग ‘या’ पद्धतीने भरा कर; सरकारने बदलले नियम

नवी दिल्ली: भारत सरकारने डिजिटल युगातील बदलत्या कमाईच्या स्रोतांवर लक्ष ठेवून आयकर नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता YouTube, Instagram, TikTok यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून कमाई करणाऱ्या इन्फ्लुएंसर्सना त्यांच्या उत्पन्नासाठी एक विशेष कोड वापरावा लागणार आहे. 2024-25 आर्थिक वर्षासाठी आयकर विभागाने '16021' हा नवीन कोड सादर केला आहे, जो सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्ससाठी लागू असेल.

कोणासाठी आहे हा नवीन कोड?

हा कोड ब्रँड प्रमोशन, उत्पादन विक्री, डिजिटल कंटेंट तयार करणे आणि जाहिराती यांमधून कमाई करणाऱ्यांसाठी आहे. अशा व्यक्तींना आता ITR-3 किंवा ITR-4 फॉर्मद्वारे त्यांच्या उत्पन्नाची संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे.

हेही वाचा - तुमच्या नावावर कोणी बनावट कर्ज घेतले आहे का? पॅन कार्डच्या मदतीने एका क्लिकवर जाणून घ्या

नवीन कोड्सची यादी:

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर – 16021

कमिशन एजंट – 09029

स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंग – 21009

फ्युचर्स व ऑप्शन ट्रेडिंग (F&O) – 21010

शेअर खरेदी-विक्री – 21011

इन्फ्लुएंसर्ससाठी काय बदल झाले?

पूर्वी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स इतर श्रेण्या वापरून रिटर्न भरत असतं. त्यामुळे त्यांच्या व्यवसायाचे नेमके स्वरूप स्पष्ट होत नसे. आता विशेष कोडमुळे त्यांच्या व्यवसायाची ओळख सोपी होणार आहे. ITR-4 फॉर्म भरून आयकर कलम 44ADA अंतर्गत त्यांना अंदाजे उत्पन्नावर कर सवलतीचा लाभही घेता येणार आहे.

हेही वाचा - चार्जर प्लग इन, बटन ऑन, फोन कनेक्ट नाही.. माहीत आहे तुम्ही दर सेकंदाला किती वीज वाया घालवताय?

शेअर मार्केटसाठी नवे नियम - 

याशिवाय, शेअर बाजारातील ट्रेडर्ससाठीदेखील नवे कोड जारी करण्यात आले आहेत. F&O ट्रेडिंगसाठी 21010 हा कोड लागू असेल. अशा ट्रेडर्सना त्यांचे संपूर्ण नफा-तोट्याची माहिती ITR-3 फॉर्मद्वारे सादर करावी लागेल. डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वाढत्या प्रभावामुळे सरकारने कर प्रणाली अधिक पारदर्शक आणि वर्गीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इन्फ्लुएंसर्स, ट्रेडर्स आणि एजंट्सना आता योग्य कर आकारणीसाठी स्पष्ट कोड वापरून रिटर्न भरावा लागणार आहे.