शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता 'या' ID शिवाय मिळणार नाही 'पीएम किसान' योजनेचा लाभ
नवी दिल्ली: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता नुकताच जाहीर झाला आहे. देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे जमा करण्यात आला आहे. मात्र, आता या योजनेत नवीन शेतकऱ्यांची नोंदणी करताना कडक नियम लागू करण्यात आले आहेत. नवीन लाभार्थ्यांसाठी सरकारने किसान आयडी अनिवार्य केली आहे. सुरुवातीला 14 राज्यांमध्ये हा नियम लागू करण्यात आला असून हळूहळू तो सर्व देशभर राबवण्यात येणार आहे.
किसान आयडीची अट - सरकारच्या निरीक्षणात अनेक बनावट नोंदणीचे प्रकार आले होते. अनेक गैर-शेतकऱ्यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे लाभ घेतला होता. त्यामुळे फसवणुकीला आळा घालण्यासाठी आणि खरी पात्रता निश्चित करण्यासाठी किसान आयडीची अट घालण्यात आली आहे.
किसान ओळखपत्र कसे मिळवायचे?
सरकार राज्यांच्या सहकार्याने डिजिटल शेतकरी डेटाबेस तयार करत आहे. तुमची जमीन, पीक आणि इतर माहिती त्यात डिजिटल पद्धतीने जोडली जाईल. किसान ओळखपत्रासाठी, तुम्ही स्थानिक कृषी कार्यालय किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन नोंदणी करू शकता. यासाठी आधार कार्ड, जमिनीची कागदपत्रे, बँक तपशील यासारखी महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवा.
हेही वाचा - सावधान! बँक खात्यात अचानक करोडो रुपये आले? खर्च केल्यास होऊ शकतो तुरुंगवास
पीएम किसान योजना -
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली. लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. दरवर्षी, थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) द्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात तीन हप्त्यांमध्ये 6 हजार रुपये पाठवले जातात. या पैशातून शेतकरी बियाणे, खते, सिंचन किंवा इतर किरकोळ खर्च भागवू शकतात. आतापर्यंत या योजनेद्वारे देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना 3.90 लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम देण्यात आली आहे.
हेही वाचा - महसूल विभागाचे मोठे पाऊल! 7/12 उताऱ्यावरचा अ.पा.क. शेरा तातडीने हटवला जाणार
या योजनेचा लाभ कोणाला मिळत नाही?
या योजनेचा लाभ फक्त अशा शेतकऱ्यांनाच मिळतो ज्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन आहे. परंतु जर एखाद्या शेतकऱ्याचे उत्पन्न जास्त असेल किंवा तो एखाद्या विशेष व्यवसायात असेल तर त्याला या योजनेतून वगळण्यात येते. डॉक्टर, इंजिनीयर, वकील, सरकारी कर्मचाऱ्याला या योजनेचा लाभ मिळत नाही.