घटस्फोटानंतर पतीकडून मिळणाऱ्या पोटगीवर पत्नीलाही कर भरावा लागेल का? कायदा काय सांगतो? जाणून घ्या
घटस्फोटाच्या अनेक प्रकरणांमध्ये, पतीला केवळ पोटगीच नाही तर त्याच्या मालमत्तेचा एक मोठा भाग पत्नीला द्यावा लागतो. घटस्फोटानंतर जगण्यासाठी आर्थिकदृष्ट्या कमकुवत जोडीदाराला, विशेषतः पत्नीला मदत करण्यासाठी पोटगी दिली जाते. पत्नीला तिचा खर्च भागवता यावा आणि ती आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहावी, यासाठी पतीकडून ही रक्कम देण्यात येते. पण अनेकांना हा प्रश्न पडतो की, पत्नीला या रकमेवर किंवा मालमत्तेवर कर भरावा लागेल का? पोटगीवर वेगवेगळे कर नियम आहेत का? चला तर मग जाणून घेऊयात...
घटस्फोटानंतर पत्नीला मिळणाऱ्या पोटगीवर कर भरावा लागेल की नाही हा प्रश्न अनेक लोकांमध्ये गोंधळ निर्माण करतो. भारतीय आयकर कायद्यानुसार, घटस्फोटानंतर पत्नीला मिळणारी पोटगी ही सामान्यतः करपात्र उत्पन्न मानली जात नाही. तथापि, काही विशिष्ट परिस्थितीत, पोटगी करपात्र असू शकते. तज्ञांच्या मते, पोटगीची करपात्रता ती कशी आणि कोणत्या स्वरूपात दिली जाते यावर अवलंबून असते. पोटगी तीन वेगवेगळ्या प्रकारे दिली जाऊ शकते - एकरकमी पेमेंट म्हणून, नियमित मासिक किंवा वार्षिक पेमेंट किंवा मालमत्तेच्या हस्तांतरणाद्वारे. या सर्व श्रेणींमध्ये कर नियम वेगवेगळे असू शकतात.
हेही वाचा - 'मोफत धान्य आणि फुकट दिलेल्या पैशांमुळे लोक काम करू इच्छित नाहीत...' फ्रीबीजवर सर्वोच्च न्यायालयाची नाराजी
एकरकमी पोटगी -
जर पोटगी एकरकमी पोटगी म्हणून दिली गेली तर ती सामान्यतः करमुक्त मानली जाते. अशा रकमा भांडवली पावत्या म्हणून गणल्या जातात. प्रतापगडच्या राजकुमारी माहेश्वरी देवी विरुद्ध सीआयटी या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते की, एकरकमी पोटगी ही उत्पन्न म्हणून नव्हे तर भांडवली मालमत्तेचे हस्तांतरण म्हणून पाहिली पाहिजे. तथापि, जर हे पेमेंट सहमतीने झालेल्या कराराचा भाग असेल, तर त्याला आव्हान दिले जाऊ शकते.
हेही वाचा - पत्नीसोबत जबरदस्तीने अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाची टिपण्णी
नियमित मासिक किंवा वार्षिक देयके
घटस्फोटानंतर पत्नीला नियमित अंतराने (दरमहा किंवा दरवर्षी) आवर्ती पोटगी मिळत असेल, तर ती भांडवली पावती म्हणून गणली जात नाही, तर ती उत्पन्न म्हणून गणली जाते आणि त्यावर कर आकारला जातो. दिल्ली उच्च न्यायालयाने एसीआयटी विरुद्ध मीनाक्षी खन्ना प्रकरणातही असा निर्णय दिला होता की, घटस्फोटाच्या तडजोडीचा भाग म्हणून जर पत्नी मासिक पोटगी सोडून देते आणि एकरकमी रक्कम घेते तर त्यावर कर आकारला जाणार नाही. परंतु जर ही रक्कम मासिक किंवा वार्षिक स्वरूपात मिळाली तर ती इतर स्रोतांमधून मिळणारे उत्पन्न म्हणून गणली जाईल आणि पत्नीला त्यावर कर भरावा लागेल.
मालमत्ता हस्तांतरित करून देण्यात येणारी पोटगी -
घटस्फोटादरम्यान किंवा त्यापूर्वी पती-पत्नीमध्ये मालमत्ता हस्तांतरित झाल्यास, कर स्थिती हस्तांतरण केव्हा झाले यावर अवलंबून असते. घटस्फोटापूर्वी मालमत्ता हस्तांतरित झाल्यास ती भेट मानली जाते आणि ती करमुक्त असते. तथापि, या मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न (जसे की भाडे) मालमत्ता हस्तांतरित केलेल्या व्यक्तीच्या उत्पन्नात जोडले जाते. तसेच, या मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागतो.
घटस्फोटाशिवाय पोटगी
जर पती-पत्नी घटस्फोट न घेता वेगळे राहत असतील आणि पत्नीला पोटगी मिळत असेल, तर त्याची कर स्थिती ही देयके कोणत्या आधारावर दिली जात आहेत यावर अवलंबून असते. जर ती न्यायालयाच्या आदेशाचा किंवा लेखी कराराचा भाग असेल, तर ती करपात्र मानली जाईल. जर ते कोणत्याही कायदेशीर घोषणेशिवाय दिले गेले तर ते भेट म्हणून मानले जाईल आणि करमुक्त असेल.
पोटगी देणाऱ्याला कर सवलत मिळते का?
पोटगी देणाऱ्याला कर सवलत मिळते का? असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. पण याचं उत्तर पण जाणून घेऊयात. पोटगी देणाऱ्या व्यक्तीला त्यावर कोणतीही कर सूट मिळत नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार, पतीच्या पगारातून पत्नीला थेट दिलेली रक्कम देखील पतीच्या उत्पन्नाअंतर्गत करपात्र असेल. हे एक वैयक्तिक बंधन मानले जाते आणि कर सवलत म्हणून त्याचा लाभ घेता येत नाही.